नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर विलंब वेतनाबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांना निवेदन देऊन लवकरात लवकर वेतन उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना नाशिकच्या कार्यकारिणीच्या वतीने वेतनाच्या विलंबाबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून एकीकडे गौरविले जात असताना दुसरीकडे महिन्याचे वेतन वेळेवर होत नसल्याने कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डिसेंबरचे वेतन जानेवारी संपुष्टात येत असतानाही मिळालेले नाही. तसेच या विलंबामुळे आता जानेवारी महिन्याच्या वेतनालादेखील विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसंचालक डॉ. गांडाळ यांना निवेदन देऊन पाठपुरावा करीत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. युवराज देवरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. पंकज जाधव, डॉ. अनंत पवार, डॉ. गिरीश देवरे, डॉ. तुषार देवरे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
फोटो
२८ हेल्थ निवेदन