नाशिक : महापालिकेत दिवाळी साजरी करताना अत्यावश्यक कर्तव्याची जबाबदारी असलेल्या विभागांनी दक्ष राहावे, असे आदेश सोमवारी (दि.५) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. दरम्यान, येत्या बुधवारीच महापालिकेचा वर्धापनदिन आहे. तथापि, दिवाळीची सुटी असल्याने कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नसल्याने यंदाचा वर्धापनदिन सुनासुनाच जाणार आहे. सध्या दिवाळी सुरू झाली असून बुधवार (दि.७) पासून महापालिकेस सुटी लागणार आहे. शुक्रवारी भाऊबीजेस दिवाळी संपणार असली तरी शनिवारी (दि. १०) दुसºया साप्ताहिक शनिवारमुळे सुटी असेल तर त्यानंतर रविवार असल्याने सोमवारी (दि.१२) प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी (दि.५) खातेप्रमुखांच्या बैठकीत बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय, विद्युत, अग्निशमन या तीन विभागांना सुटीचा आनंद घेतानाच कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा आपत्तीसंदर्भात दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो त्यानंतर लगेचच ७ नोव्हेंबर रोजी महापालिकेचा वर्धापनदिन असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम सलग तीन दिवस चालतात, परंतु यंदा ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याने महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसेल, असे दिसत आहे.
मनपात अधिकाऱ्यांना रेड अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:34 AM