पेठरोड बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धान्य व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्याने शुक्रवारी सकाळी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे व नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत सेसविषयी चर्चा करण्यात आली; मात्र कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही. एकीकडे धान्य किराणा घाऊक व्यापारी सेस भरण्यास तयार नाही तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजारसमिती सेस रक्कम वसूल करण्यासाठी मागे हटत नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली. राज्यातील ३८ पैकी ४ बाजार समित्या थोडा सेवा शुल्क आकारतात; मात्र नाशिक बाजार समिती जास्त शुल्क घेते, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. तर बाजार समिती बंद गाळे जप्त करू, अशी धमकी देतात. कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवा शुल्क विषयावर तोडगा निघत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांची बाजार समितीत येणारे वाहने प्रवेशद्वारावर अडवू नये, असा आदेश शासनाने बाजार समितीला द्यावे, अशी मागणी उपस्थित नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक खरे यांच्याकडे केली. सेस विषयावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद कायम राहील, असे किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत प्रफुल संचेती, अशोक वैश्य, राकेश भंडारी, प्रसाद जाजू, जितेंद्र बोरा, परेश बोधानी, शेरणीक शहा, कमलेश कोठारी आदींसह व्यापारी उपस्थित होते.
व्यापारी व बाजार समिती यांच्यातील बैठक निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:31 AM