सिडको : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाजात निराशा पसरली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत पुढील धोरणाविषयी रणनीती आखण्यासाठी मराठा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांची शनिवारी (दि.८) सिडकोतील शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालयात कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पाळून बैठक घेण्यात आली.
सिडको विभागातील या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे संयम ठेवून पुढील आरक्षणाची लढाई कोणत्या मार्गाने पुढे न्यावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता आरक्षण हे गरजेचे असून ते मिळालेच पाहिजे, असा सूर या बैठकीत उमाटला. यावेळी आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, आण्णा पाटील, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, आशिष हिरे यांनी समाज प्रतिनिधींना कोरोनाचे संकट समोर असल्याकारणाने शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी बाळासाहेब गीते, संजय भामरे, अविनाश पाटील, अमोल पाटील, आबा पाटील, सुयश पाटील, हर्षल चव्हाण, नाना ठोंबरे, भूषण पाटील, संजय देशमुख, महेश देवरे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.