नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. लोकहितवादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी कुसुमाग्रज स्मारकात पार पडली. १० वाजता गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आलेल्या सभेला १०.३० वाजता प्रारंभ झाला. यावेळी इतिवृत्त मंजुरीसह विषयपत्रिकेवरील २०-२१च्या अंदाजपत्रकाचा विषय वगळता अन्य सर्व विषयांना मंजुरी मिळाली. यावेळी बोलताना अध्यक्ष जातेगावकर यांनी राज्य साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दिलेला असून, महामंडळाची समिती ७ जानेवारीला स्थळपाहणी करण्यास येणार असल्याचे सांगितले. त्या समितीच्या स्थळपाहणीनंतरच्या आठवडाभरात साहित्य संमेलन नाशिकला होणार की नाही, ते निश्चित होणार आहे, तसेच महामंडळाला हे थोड्या नियंत्रित स्वरूपातील संमेलन मार्चअखेरपर्यंतच घ्यायचे असल्याने निर्णयानंतरच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. मात्र, प्रस्ताव जरी लोकहितवादी मंडळाने दिला असला, तरी हे संमेलन नाशिककरांचे असेल. त्यामुळे संमेलन यशस्वी झाले तरी नाशिकचे नाव होणार असून, त्रुटी राहिल्या, तरी गावाच्या नावावर जाणार असल्याने, सर्व नाशिककरांनी मिळून संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले, तसेच लोकहितवादी मंडळाचे ज्योतीकलश सभागृह हे मनपाने ताब्यात घेतलेले असले, तरी त्याबाबत संस्थेचे विश्वस्त आणि माजी आमदार हेमंत टकले हे आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले. विषयपत्रिकेचे वाचन सुभाष पाटील यांनी केले. किरण समेळ यांनी अंदाजपत्रक मांडले. मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ऐन वेळच्या विषयात श्रीकांत बेणी यांनी ज्योतीकलश सभागृह पुन्हा मंडळाला मिळावे, यासाठी काय प्रयास झाले, त्याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले, तसेच संमेलन नाशिकला झाल्यास त्यातून मंडळालाही आर्थिक बळ मिळू शकेल, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर सुभाष पाटील, दिलीप साळवेकर, भगवान हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अंदाजपत्रकासाठी बोलावणार विशेष सभा यंदाच्या वर्षीचे साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित होण्यास आठवडाभराहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे संमेलन नाशिकला मिळाल्यास त्याबाबतच्या प्रस्तावित खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे आताच्या सभेत यंदाच्या २०-२१च्या अंदाजपत्रकाच्या मंजुरीचे काम पुढे ढकलण्यात आले, तसेच आवश्यकतेनुसार पुढील पंधरवड्यात त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णयही अध्यक्षांनी जाहीर केला.
नाशिकला संमेलन मिळाल्यास यशस्वी करण्याचा सभेत केला निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 1:36 AM