नाशिक : शहरात डेंग्यूने घातलेले थैमान आणि अन्य कुंभमेळ्याचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना, पालिकेची महासभा सलग दुसऱ्यांदा तहकूब झाली आहे. दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून महापौर अशोक मुर्तडक यांनी ही सभा तहकूब केली. सलग दोन सभा तहकूब झाल्याने आता नव्या महापौरांची हॅट्ट्रिककडे वाटचाल सुरू झाली आहे.महापौरपदाची निवडणूक १२ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. जनतेवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याने महासभेच्या पटलावर कोणत्याही विभागाने प्रस्तावच पाठविले नाहीत. त्यातच काही नगरसेवकांच्या आप्तेष्टांचे निधन झाले त्यामुळे त्यांना आणि अन्य महत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून २० आॅक्टोबर रोजी नव्या महापौरांची पहिलीच महासभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आता साधुग्रामसाठी अतिरिक्त टीडीआर देणे आणि वीज मंडळाला फुकटची जागा देणे यासाठी विशेष महासभा बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आली होती; परंतु या महासभेत नगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्या भगिनी मीराताई बोराडे तसेच भाजपा नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांच्या आई राजाबाई निंबाजी वाघ तसेच विजय मोटर्स ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विजय देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करून महासभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे कोणत्याच विषयावर चर्चा होऊ शकली नाही. आता पुढील महासभा येत्या शनिवारी (दि. १) होणार असून, त्यावेळी पुन्हा सभा तहकूब झाली तर नव्या महापौरांची सभा तहकूब होण्याची हॅट्ट्रिक होणार आहे. (प्रतिनिधी)
सभा तहकुबीच्या हॅट्ट्रिककडे वाटचाल
By admin | Published: October 30, 2014 12:15 AM