अझहर शेख,
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यानाशिक येथील सभेत चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असून सभास्थळी येणाऱ्यांची पोलिसांकडून कसून झडती घेतली जात आहे. कंगव्यापासून पेनपर्यंत अन पैशाच्या पाकिटांपासून रुमालपर्यंत सगळ्या वस्तू तपासल्या जात आहेत. कंगवा, चुना डबी, पेन, अशा वस्तू प्रवेशद्वारावरच जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे खटके उडत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नाशिकच्या पिंपळगावमधील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभा होत आहे. या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून सभेला येणाऱ्या नागरिक आणि कार्यकर्त्यांची कसून तपासणी होत आहे. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशवीतून आणलेले खाद्यपदार्थ यांनाही बंदी घालण्यात आली आहे. एकूणच पोलिसांनी मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला तपासून प्रवेश दिला आहे. पिंपळगाव बसवंत कांदा उत्पादनामध्ये अव्वल असल्याने संतप्त शेतकऱ्यांकडून कांदाफेकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेने कांदा उत्पादकांच्या रोषाचा धसका घेत नागरिकांची चांगलीच झडती घेतली आहे. दरम्यान, मोदींच्या सभेच्या ठिकाणी काही डाव्या विचारांच्या संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.