र्यंबकेश्वर : मध्यंतरी निवृत्तिनाथ देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे घाटत होते. तथापि याबाबत अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी येत्या ३० आॅगस्टला माझ्या राजीनाम्याबाबत माझी भूमिका विशद करील, अशी भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे मंगळवारी (दि. ३०) सभा झाली. अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड हे जरी वयस्कर असले तरी त्यामुळेच वारकरी बांधव, भाविक आदिंनी भरभरून साथ दिली आणि जवळपास ८५ लाखांचा चांदीचा रथ आज उभा राहिला. निवृत्तिनाथ देवस्थानचे वैभव वाढू लागले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारकऱ्यांसाठी एक कोटी ६३ लाख रुपयाचे भक्त निवास पूर्णत्वाकडे आहे तर संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर उभारण्याचे काम लवकरच आकार घेणार आहे. हे काम अल्पावधीत आकारास आले आहे. समाधी संस्थानचे काम अद्याप आकारास यावयाचे आहे. असा सर्व विचार करून अनेकांनी मध्यस्थी करून होत असलेल्या अध्यक्ष बदलाच्या हालचालींना विरोध केला. गायकवाड हे वयोवृद्ध असून, त्यांचा सन्मान करून त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांना सन्मानाने स्वीकार करा, अशी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर त्याचे पडसाद आज झालेल्या सभेत उमटले आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला. त्यानंतर आजची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अजेंड्यावर असलेल्या विषयावर विचारपूर्वक निर्णय घेण्यात आले. त्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे नियोजित समाधी मंदिर उभारण्याच्या कामासाठी आर्किटेक्ट, इंजिनिअर म्हणून नाशिकचे दिवंगत खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता वसंतराव पवार यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या बैठकीसाठी स्वत: अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, सचिव जयंत सुरेश गोसावी, पुंडलीक भाऊराव थेटे, रामभाऊ नथू मुळाणे, पवनकुमार नंदकिशोर भुतडा, ललिता संदीप शिंदे, धनश्री मिलिंद हरदास, पंडितराव कोल्हे, जिजाबाई मधुकर लांडे, संजय भिकाजी धोंडगे, अविनाश पद्मनाथ गोसावी, योगेश सोपान गोसावी आदिंसह त्र्यंबक नगरपालिकेचे भूतपूर्व मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांची बदली झाल्याने व त्यांच्या जागी आलेल्या चेतना (मानुरे) केरुरे यांच्या नियुक्तीचे देवस्थानला पालिकेकडून पत्र प्राप्त झाल्याने आजच्या सभेत त्यांच्या नियुक्तीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)
निवृत्तिनाथ देवस्थानची सभा खेळीमेळीतत्
By admin | Published: August 31, 2016 10:36 PM