सिडको : राज्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, अशा परिस्थितीत सार्वजनिक गणेश उत्सव हे शांततेत करा. तसेच यानिमित्त मंडळाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केले.अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सदस्यांनीही सूचना मांडल्या. यात नगरसेवक सुधाकर बडगुजर, संतोष सोनपसारे, संजय भामरे, सुनील जगताप, नामदेव पाटील यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षी राज्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे अवाजवी खर्च न करता जमा झालेल्या वर्गणीतून दुष्काळग्रस्तांना मदत करावी, तर नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी मंडळांनी रस्त्याला अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारावे. नंदा मथुरे यांनी मंडळाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी ठेवावा, असे सांगितले. एकता मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक विषयावर प्रबोधनपर देखावे, सादर करावेत. वर्गणी जमा करताना काही मंडळांचे पदाधिकारी हे खंडणी गोळा करण्यासारखेच येतात. त्यांच्यावर लगाम घालावा, असे अंबादास येलमामे यांनी सांगितले. यावेळी सुनील अहिरे, प्रशांत गारसे, सुरेश पवार, योगेश गांगुर्डे, भूषण पाटील, आदिंनीही सूचना केल्या. सूत्रसंचालन व आभार पोलीस कर्मचारी सुपले यांनी केले. (वार्ताहर)
अंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
By admin | Published: September 10, 2015 12:01 AM