नाशिक : गत चार संचालक मंडळाने प्रयत्न करूनही विक्री न झालेल्या जागेची विक्री झाली असली तरी खरेदीदाराकडे शिल्लक असलेली सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम व त्यावरील व्याज वसुलीचे पडसाद क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले़ तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या संस्थेच्या मालकीच्या जागांवर शाळा, महाविद्यालये उभारण्याबरोबरच शहरालगत संस्थेसाठी नवीन जागा खरेदी व विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन सभा शांततेत पार पडली़ सभेच्या प्रारंभीच नाशिकमधील जागेची विक्री व खरेदीदाराकडे शिल्लक असलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्याची मागणी सभासद अॅड़ पी़ आऱ गिते व पंढरीनाथ थोरे यांनी केली़ या जागेपोटी संस्थेला सुमारे २६ कोटी रुपये मिळाले असून, सव्वादोन कोटी रुपये खरेदीदाराकडे शिल्लक आहे़ मात्र जागा विक्रीनंतर काहींनी घेतलेला आक्षेप व शासनाचा देवस्थान जागेबाबतचा अध्यादेश यामुळे सातबाऱ्यावर खरेदीदाराचे नाव लागत नसल्याने दोघांच्याही अडचणी वाढल्याचे संचालक मंडळाने सांगितले़संचालक मंडळाला जागेच्या मुद्द्यावर लक्ष्य करून शिल्लक रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी सभासदांनी केली़ त्यावर खरेदीदाराचे नावच जागेवर लागत नसल्याने उर्वरित रक्कम कशी मागणार, तसेच खरेदीदारच दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही जागा विकण्याच्या तयारीत असून, तुम्हीच ग्राहक असेल तर सांगा, असे आवाहन आव्हाड यांनी केल्याने विरोधकांचा सूरच मावळला़ सभेतील चर्चेत अशोक कातकाडे, रामप्रसाद कातकाडे आदिंसह सभासदांनी सहभाग घेतला होता़ व्यासपीठावर एन. एम. आव्हाड, दामोदर मानकर, तानाजी जायभावे यांच्यासह सस्थेचे संचालक व विश्वस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाद वगळता सभा शांततेत
By admin | Published: December 27, 2015 10:29 PM