प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित व कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांची माहिती घेण्यात आली. राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी संघटनात्मक कामासाठी सक्रिय राहिले पाहिजे. आपापल्या जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणीविषयी व कोरोनामुळे नुकसान झालेल्यांची माहिती घेतली पाहिजे, असे मत सरचिटणीस बालाजी पवार यांनी व्यक्त केले. अनेक जणांकडे माहिती उपलब्ध नाही, त्यांनी माहिती गोळा करून राज्य संघटनेकडे ती सादर करावी असे ठरले.
कोरोनामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना आर्थिक मदत मिळावी, लस उपलब्ध करून दिली पाहिजे, निधन झालेल्या विक्रेत्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी, बाधितांना मदत करावी, कमिशन वाढ झाली पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावर संघटनेच्या वतीने काही व्यवस्थापनाकडे निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी विनंती केल्याची माहिती पवार यांनी दिली. पाटणकर यांनी सर्व व्यवस्थापन किंवा शासनावर अवलंबून न राहता आपण काहीतरी केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच संघटनेने काही माहिती मागितल्यावर ती लवकर दिली पाहिजे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे सांगून आपल्यासारख्या अनेक व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आपापल्या जिल्ह्यातील राजकीय नेते, मंत्री यांच्याकडे निवेदन दिले पाहिजे. त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही पाटणकर म्हणाले.
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या बाबतीत सर्व जिल्ह्यांतील माहिती गोळा करून शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी, फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करावे, जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना लस उपलब्ध करून देण्यात यावी, वृत्तपत्र विक्रेता कोरोना लस शिबिर आयोजित करावे, बाधित व सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगार म्हणून आर्थिक मदत मिळावी, असंघटित कामगार म्हणून लवकरात लवकर नोंदण्या सुरू कराव्यात, इत्यादी मागण्यांचे निवेदन तयार करून एकाच दिवशी ते सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आरोग्य मंत्री यांना देण्याचे ठरले. तसेच आणखी काही माहिती व सूचना असल्यास सरचिटणीस बालाजी पवार यांच्याकडे मेसेजच्या माध्यमातून कळवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले.
बैठकीत उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संघटन सचिव रवींद्र कुलकर्णी, शिवाजी खेडकर, कोकण विभाग निमंत्रक प्रभारी दत्ता घाडगे, का. सदस्य राजू टिकार, मनीष राजनकर, जगदीश उमरदंड, भारत माळवे, दत्ता ठाकरे यांनी आपापल्या जिल्ह्यातील माहिती सादर केली. तसेच बैठकीत कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मनीष वासनिक, सूर्यकांत टेंबे, महेश कुलथे, रवींद्र कांबळे, किशोर सोनवणे आदी सदस्यांनी सहभाग घेतला. आभार पवार यांनी मानले.