लोहोणेर : कर्जाच्या बोज्याखाली दबत चाललेल्या वसंतदादा पाटील साखर कारखाना चालविण्याचे सर्वच मार्ग बंद झाल्याने बँकेने हा कारखाना खासगी तत्त्वावर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रथम सभासद व कामगारांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल अहेर यांनी कामगारांना दिल्याने शनिवारी वसाकाच्या कामगारांमधील चलबिचल थांबली. वसाका खासगी व्यापाऱ्याला चालविण्यास देण्यात येणार असून, या ठिकाणी बाहेर गावाहून काही कामगार व इतर अधिकारी गेल्या चार-दिवसांपासून हजर झाल्याने वसाका कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात कामगारांची बैठक बोलविण्यात आली होती. वसाकाचे सभासद प्रभाकर पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, माजी अध्यक्ष विलास देवरे, रवींद्र सावकार, कुबेर जाधव यांच्यासह सभासद तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी मार्गदर्शन केले. पंडित निकम, रावसाहेब पवार, राजेंद्र पवार, भीमराव ठाकरे, शिवाजी देवरे, नाना अहिरे, राजेंद्र भाऊसिंग, कैलास सोनवणे आदींनी कामगारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी कामगारांना मागील देणे मिळावे, सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना प्राधान्य देऊन करार करण्यात यावा, अशी मागणी केली. अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी वसाका चालविण्यास प्राधिकृत मंडळाचे प्रयत्न अपुरे पडले. सभासदांच्या देणेबाबत तारीख पे तारीख देऊन वेळकाढू धोरण अवलंबले. कामगारांनी आपली एकजूट ठेवून आपले प्रश्न सोडवावेत, असे आवाहन केले. कुबेर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र सावकार यांनी आभार मानले. बैठक संपल्यावर प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. राहुल अहेर हे आपल्या सहकारी मंडळासह याठिकाणी हजर झाले. यावेळी कामगार व डॉ. आहेर व कामगारांमध्ये सविस्तर चर्चा झाली. अहेर यांनी कामगारांच्या शंकांचे निरसन करीत वसाकासंदर्भात करार करताना कामगार व सभसदांना विश्वासात घेऊन त्यांच्या देणीबाबत प्राध्यान दिले जाईल. वसाका खासगी व्यापाºयाला देण्याबाबत कोणताही करार अद्याप केलेला नसून, वसाका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय सर्वस्वी बॅँकेचा आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी ऊस उत्पादक सभासद व कामगारांना अग्रस्थानी ठेवून सर्व हित लक्षात घेऊनच करार केला जाईल, असे असे सांगितले. यावेळी प्राधिकृत मंडळाचे सदस्य अभिमन पवार, बाळासाहेब बच्छाव, माजी चेअरमन संतोष मोरे ,आण्णा शेवाळे, महेंद्र हिरे, बाळू बिरारी हे उपस्थित होते.देसले यांना कार्यमुक्त करण्याचा ठराववसाकाचे कार्यकारी संचालक बी. डी. देसले कामगारांना योग्य न्याय देत नसून, वसाकाच्या या परिस्थितीस देसलेच कारणीभूत आहेत. त्यांना कार्यमुक्त केल्याशिवाय वसाकाची सुधारणा होणार नाही. त्यांना त्वरित कामकाजामधून निवृत्त करावे, अशी मागणी यावेळी उपस्थित कामगारांनी बैठकीत करीत तसा ठराव संमत केला.
वसाका कामगारांची कार्यस्थळावर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:02 AM