कन्हैया कुमार यांची सभा : गोंधळाच्या संशयावरून एका युवकाला घेतले ताब्यात
नाशिक : पाण्याच्या बाटल्या आणि काळे वस्त्र नेण्यास मनाई, इतकेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातील साध्या साध्या गोष्टीही तसेच रुमाल नेण्यास मज्जाव अशा कडेकोट नियमावलीनुसार तपासणी करीत कन्हैया कुमार यांच्या सभेत प्रवेश देण्यात आला. सुमारे दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात ही सभा पार पडली. सभेच्या अखेरीस मात्र गोंधळाच्या संशयावरून पोलिसांनी आणि स्वयंसेवकांनी एकास ताब्यात घेतले. हा अपवाद वगळता सभा शांततेत पार पडली.शहरातील विविध संघटनांच्या वतीने कन्हैया कुमार यांची सभा आयोजित केली होती. तत्पूर्वी या सभेस पोलिसांनी परवानगी देऊ नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी निवेदने काही संघटनांनी दिली होती़ त्यामुळे पोलिसांनी विशेष काळजी घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला होता़ तुपसाखरे लॉन्सच्या प्रवेशद्वारावरच संविधान सभेस येताना कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचनांचे फलक लावण्यात आले होते़ सभेसाठी येणाºयांनी आणलेल्या पाण्याची बॉटल, बॅग तर मोठी पर्स असलेल्या महिलांनाही पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले़ विशेष म्हणजे काळा शर्ट परिधान केलेले युवक-युवती व नागरिक तसेच काळा रुमाल, काळी ओढणी तसेच काळ्या रंगाच्या वस्तू सभेच्या ठिकाणी नेण्यास पोलिसांनी पूर्णत: बंदी घातली व या वस्तू प्रवेशद्वारावरच ठेवल्यानंतरच सभेसाठी जाण्यास परवानगी दिली़ सभास्थानी साध्या वेशातील पोलीस तसेच संयोजकांचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले. सभेची वेळ साडेतीन वाजेची असली तरी पाच वाजेच्या सुमारास कन्हैया कुमार यांचे आगमन झाले. तोपर्यंत शाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसेने कार्यक्रमात रंगत आणली. युवा नेत्याच्या आगमनानंतर हमे चाहिए आझादी या गीताला तर सर्वांनीच उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या समारोपाला खुद्द कन्हैया कुमार यांनी याच क्रांतिगीतावर सर्वांना ताल धरायला लावला. कन्हैया कुमार यांचे भाषण संपत असताना एक युवक घोषणा देण्याच्या तयारीत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे काहीसा गोंधळ झाला. मात्र सभा शांतते पार पडली. या सभेसाठी पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्तविजयकुमार चव्हाण, अजय देवरे, यांच्यासह ९ पोलीस निरीक्षक, १७ एपीआय/पीएसआय, १०८ पोलीस कर्मचारी, दोन बीट मार्शल, स्ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्तात सहभागी होते.काळे कपडे परिधान केल्याचा फटकातुपसाखरे लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात कन्हैया कुमार यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आले होते़ मात्र, पोलीस तपासणी केल्याशिवाय कोणासही प्रवेश देत नव्हते़ त्यातच काळ्या रंगाचा शर्ट, रुमाल, ओढणी तसेच काळ्या रंगाच्या वस्तू प्रवेशद्वारावरच काढून घेतल्या जात होत्या़ केवळ काळ्या वस्तूच नव्हे तर पाण्याची बाटलीही काढून घेतली जात होती़ यावेळी सभेस काळ्या रंगाचा शर्ट परिधान करून आलेल्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखल्यामुळे त्यांना शर्टवर जॅकेट परिधान करावे लागले़, तर काहींनी मित्राच्या शर्टची अदलाबदल करून सभेसाठी प्रवेश मिळविला़