नायगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होताच गावपातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. गावोगावी पॅनलनिर्मितीसाठी आतापासूनच कोपरा बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या मोसमात गावागावांत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
गावगाड्याची अर्थातच ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजताच गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या जाहीर झाल्यापासून गावखेड्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांच्या हरकती व सूचना ७ डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार याद्याच येणाऱ्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
सर्वाधिक चुरशीची व डावपेचांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितले जाते. काल-परवा बरोबर फिरणारे आत्ता दुसऱ्यांच्या शोधात, तर कोणता उमेदवार पॅनलसाठी फायद्याचा, या शोधात गावपुढारी सध्या चाचपणी करत आहेत. शासनाने गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. त्यातच गावपातळीवर विकासकामांसाठी थेट व भरघोस निधी मिळत असल्याने या निवडणुकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष
गावपातळीच्या निवडणुका म्हणजे अस्सल डावपेचांचा खेळ असे बोलले जाते. त्याचाच पहिला अंक म्हणजे पॅनलनिर्मिती. योग्य व मतदारांचा मोठा भरणा मागे असलेला उमेदवार शोधून आपल्या गटात सामील करणे आदी बाबींचा विचार करण्यासाठी सध्या प्राथमिक स्वरूपाच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. अजून सरपंचपदाचे आरक्षण बाकी असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे लागून आहेत. या आरक्षण सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने रणधुमाळीला रंग चढणार आहे. नायगाव खोऱ्यातील नायगाव, देशवंडी, वडझिरे व ब्राह्मणवाडे आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या हालचालीकडे खोऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.