नाशिक : मुस्लीम महिलांचा मोर्चा, आदिवासींचा बि-हाड मोर्चा व हनुमान जयंतीनिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील प्रमुख रस्ते पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या निमित्ताने वाहतुकीसाठी बंद केले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा या काळात वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तिहेरी तलाक कायद्याला विरोध करण्यासाठी मुस्लीम महिलांचा मोर्चा भद्रकालीतील बडीदर्गा येथून दुपारी १२ वाजता सुरू होणार असून, हा मोर्चा दूधबाजार, खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित जमा होऊन शिष्टमंडळ हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी जाणार आहे. मोर्चा मार्गावर दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात येणार असून, याच काळात सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल ते शालिमार, मुंबई नाका पोलीस ठाणे ते सारडा सर्कल पावेतोचा मार्गदेखील बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करू इच्छिणा-यांनी इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे कंत्राटी कामगारांचा बि-हाड मोर्चा दुपारी ४ वाजता आदिवासी विकास आयुक्तालयावर येणार असल्याने गडकरी सिग्नल ते मोडक सिग्नल या मार्गावरील वाहतूक ‘बिºहाड’ मोर्चा संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.हनुमान जयंतीनिमित्ताने नाशिक शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक वझरे मारुती मंदिर, चौकमंडई, भद्रकाली दूधबाजार, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉर्इंट, सांगली बॅँक सिग्नल, मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड, पंचवटी या मार्गाने निघणार असून, सदर मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी वाहतूक अधिसूचना जारी केली असून, शनिवारी सकाळी ९ वाजेपासून वाहतुकीला निर्बंध लादण्यात येणार आहेत.