नाशिक : कार्यकर्त्यांकडून टीका झाल्यानंतरही भाजपाच्या आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे. सीमा हिरे यांच्या कन्येच्या उमेदवारीला विरोध झाल्याने त्यांचे नाव वगळले गेले असले तरी हिरे यांचे दीर रिंगणात आहेत. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे.भाजपाच्या वतीने १२२ उमेदवारांची यादी घोषित केली. यात नात्यागोत्यांचा भरणा नेत्यांनी केला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नातेवाइकांसाठी उमेदवारी मागू नका, असे आवाहन केले असताना दुसरीकडे भाजपाने महापालिका निवडणुकीत या आवाहनाला हरताळ फासला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र, वसंत गीते यांचे सुपुत्र प्रथमेश, सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे, आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या चुलत भगिनी हिमगौरी आडके अहेर, सुनील बागुल यांच्या मातोश्री माजी नगरसेवक भिकुबाई बागुल, नगरसेवक दिनकर पाटील आणि त्यांचे सुपुत्र अमोल अशा अनेकांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. याशिवाय भाजपा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील उमेदवारी देण्यात आली आहेत. त्यासाठी निष्ठावानांचा बळी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कोणालाही उमेदवारी देणार नाही असे पक्षाच्या वतीने प्रवक्तेप्रा. सुहास फरांदे यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. त्यामुळे पक्षातील निष्ठावानांचा आक्रोश कायम आहे.
मेहुणे.. मेहुणे...मेहुण्यांचे पाहुणे....
By admin | Published: February 04, 2017 1:38 AM