नाशिक : गंगापूररोडवरील भरवस्तीतील एका सराफी दालनाच्या शेजारी असलेले अॅपल कंपनीचे अधिकृत वितरण केंद्र ‘एलिमेंट’चे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे ८० आयफोन मोबाईल बुधवारी (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास लांबविल्याची धक्कादायक जबरी लूटीची घटना दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या अधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले.शहर व परिसरात जबरी लूटीसह सरकारी मालमत्तांना लक्ष्य करण्याबरोबरच खून, हाणामाऱ्यांसारखे प्रकार अचानकपणे वाढल्याने शांतताप्रिय शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावू लागल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारांवरील ‘खाकी’चा अंकुश अचानकपणे सैल कसा होत आहे? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. भरदिवसा रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना शस्त्रे दाखवून लूटण्याचा प्रकार असो अथवा पुर्ववैमनस्यातून धारधार शस्त्राने खून करणे असो तसेच बंद घरे फोडून लाखो रूपयांचे दागिने हातोहात लंपास करण्याचे प्रकारही राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडल्याचे चित्र आहे. परिणामी पोलीस यंत्रणा नाशिककरांचा ‘विश्वास’ गमावताना दिसून येत आहे.गंगापूररोडवर एलिमेंट नावाचे भव्य अॅपल कंपनीचे अधिकृत विक्री दालन आहे. या दालनाशेजारी एक ज्वेलर्स शोरूम असून या शोरूमभोवती सशस्त्र सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात. तसेच या भागात एकापेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एलिमेेंट शोरूमला लागूनच एक रूग्णालयदेखील आहे. यामुळे रात्रीदेखील वर्दळ थोड्याफार प्रमाणात या भागात सुरूच असते. कि मान या व्यापारी संकुलात तरी एकापेक्षा अधिक सुरक्षारक्षक विविध दालनांचे रात्रपाळीवर असतात. तरीदेखील चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडस करत काही मीटर उंच असलेले एलिमेंट दालनाचे इलेक्ट्रीक मोटारने उघडझाप करणारे मजबूत शटर उचकटून आत प्रवेश केला. दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जबरी लूट : ‘अॅपल’चे शोरूम फोडून ८० आयफोन लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 4:24 PM
दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे
ठळक मुद्देशहरात गुन्हेगारी फोफावू लागल्याचे बोलले जात आहे.सीसीटीव्हीच्याअधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.