नाशिक : नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटांवर मात करत जीवनाचा संघर्ष करणा-यांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बाळगून आहेत; मात्र गरज आहे ती त्यांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याची. अशाच एका मिळालेल्या विवाहच्छुकांच्या परिचयच्या मंचावर तीन मुलामुलींना एकमेकांचा जीवनासाथी लाभला आणि त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. निमित्त होते, लायन्स क्लब आॅफ नाशिक सुप्रीम व राजेंद्र पारख इलेक्ट्रॅनिक्सच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२५) अंध-अपंग व मूकबधीर विवाहच्छुक युवक-युवतींचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. रोटरी सभागृहात पार पडलेल्या या परिचय सोहळ्यात तीघा युवक-युवतींना एकमेकांचा जीवनाचा जोडीदार लाभला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा. सुहास फरांदे, नंदलाल पारख, राजेंद्र पारख, धनंजय बेळे, छगाबाई पारख, लायन्स क्लबचे अध्यक्ष हंसराज देशमुुख, उद्योजक धनंजय बेळे, सचिन शहा, सतीश कोठावदे, अजय आहुजा आदि उपस्थित होते. यावेळी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, विवाह हा दोन कुटुंबियांना जोडणारा धागा असतो. दिव्यांग युवक-युवतींमध्येदेखील एक वेगळ्या प्रकारची उर्जा असते आणि तेही समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून दैनंदिन जीवन जगू शकतात, तसा आत्माविश्वास बाळगण्याची गरज आहे. पारख यांनी मनोगतामधून या उपक्रमाची माहिती देत सांगितले, मागील वर्षी या परिचय मेळाव्यातून २० युवक-युवतींचा विवाह जूळुन आला. मेळाव्यात नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्र तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. देशमूख यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सतीश कोठारी यांनी केले. ---
यांना लाभला जीवनसाथी
मेळाव्यामध्ये भारती बाळू डोढक (ओझर), पुष्पा जाधव (जेलरोड), आशा शेटे (चाळीसगाव) या तीघा युवतींसह नवनाथ पाटील, चेतन पारख, राजन सदडे या युवकांनाही जीवनाचा जोडीदार लाभला. तसेच बहुतांश विवाहच्छुकांनी आपआपल्या पसंतीनुसार माहितीपत्रकात माहिती नोंदविली असून अजून विवाह या मेळाव्याच्या माध्यमातून जमून येण्यास मदत होणार असल्याचे पारख म्हणाले