नाशिक : महापालिकेच्या महासभेच्या प्रारंभीच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी डोक्यावर काळ्या टोप्या परिधान करत पीठासन अधिकाऱ्यासमोरील हौद्यात येत एलईडीप्रश्नी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एलईडीच्या करारनाम्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदस्य आसनस्थ झाले.महासभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गटनेत्या कविता कर्डक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक डोक्यावर काळ्या टोप्या परिधान करत सभागृहात अवतरले आणि थेट महापौरांसमोरील हौद्यात उभे राहत त्यांनी एलईडीप्रश्नी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. कर्डक यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शहर अंधारात असून एलईडीच्या ठेक्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. त्यावर आयुक्तांनी खुलासा करताना सांगितले, एलईडीबाबत भरपूर तक्रारी आल्या आहेत. सदर ठेका पुढे सुरू राहत नसेल तर नेहमीच्या पद्धतीने फिटिंग्ज कशा बसविता येतील, यावर विचार केला जाईल. एलईडीच्या ठेक्याबाबत अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. एखादा निर्णय घेतल्यास नंतर त्यात कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंत निर्माण होऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. जोपर्यंत ठेक्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत लाईट फिटिंग्जबाबत नेहमीची जी पद्धत वापरली जाते, त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य एलईडीप्रश्नी आक्रमक
By admin | Published: December 19, 2014 12:42 AM