नाशिक- महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा बंधनात्मक निधी परस्पर पळवल्यावरून समितीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि समितीचा निधी अन्यत्र वळवल्यास महापालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा शनिवारी (दि.५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आला. यावेळी महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या ठेकेदारासंदर्भात तक्रारी असल्याने त्याचे निराकरण करूनच प्रशिक्षण देण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि.५) सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीच्या सदस्य असलेल्या परंतु महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती असलेल्या स्वाती भामरे तसेच सत्यभामा गाडेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देण्यासाठी तेच ते बचत गट असण्यामागे कारण काय असा प्रश्न भामरे यांनी केला त्याच बरोबर अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून का दिले जात नाही असा प्रश्न त्यांनी केला तसेच महिला समितीच्या प्रस्तावांचा आगामी अंदाजपत्रकात समावेश न केल्यास हे अंदाजपत्रक टराटरा फाडू असा थेट इशारा सत्यभामा गाडेकर यांनी दिला तर स्वाती भामरे यांनी पालिका मुख्यालयाला टाळे ठोकून महिला सदस्यांसमवेत उपोषणाचा इशारा दिला.
इन्फो..
अनेक बालकांना मातेचे दूध न मिळाल्याने कुपोषणामुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने अशा बालकांसाठी मिल्क बँकेचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी स्वाती भामरे यांनी केली तर सिडकोत नागपूर पॅटर्न रस्ता फोडल्या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांनी संताप व्यक्त केला.