नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी हातात रुमणे घेऊन करतील, असा इशारा सभासदांनी वार्षिक सभेत दिला.नासाकाची सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी होते. दोन वार्षिक सभेतील विषय एकमताने मंजूर झाल्यानंतर २०१७-१८ चा चालू हंगाम कशाप्रकारे सुरू करायचा याबाबत सभासदांनी विविध सूचना केल्या. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मुदत होत असताना जिल्हा बॅँकेने कारखाना विक्रीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये तीव्र संतापाच्या भावना व्यक्त झाल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी गत आठ महिन्यांपासून कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ करीत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती सभासदांपुढे मांडून शासन सातत्याने कारखान्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेने व्याजावर व्याज लावत ते वाढविण्यात आल्याने आज कर्ज ८४ कोटींपर्यंत गेले आहे. गेल्या चार वर्षांपासून कारखान्याचा हंगाम बंद आहे व २०१३ मध्येच कारखाना १०० टक्के एनपीएमध्ये गेल्याने ४७ कोटी रुपये अतिरिक्त व्याजाचा भार टाकला आहे. बॅँकेच्या अधिकाºयांना व संचालक मंडळाला कारखाना विक्रीची घाई झाली असून, ही बाब शेतकºयांसाठी दुर्दैवी आहे. बॅँकेने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र शासन दरबारी दाखल असताना व त्या आधारे शासन कर्जाचे पुनर्गठन करून थकहमीसाठी प्रयत्न करीत असताना बॅँकेने दिलेला दाखला रद्द करणे हा षडयंत्राचा भाग आहे. अशाही परिस्थितीत कारखान्याने बॅँकेला थकीत कर्ज भरण्याची हमी दिलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात जिल्हा बॅँकेचे ६ संचालक असताना विक्रीबाबत ठराव होतो, ही बाब योग्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच संतू पा. हुळहुळे, प्रकाश जगझाप, बाळासाहेब म्हस्के, अॅड. सुभाष हारक, बाबुराव मोजाड, बबनराव कांगणे, माधवराव गंधास, अशोकराव खालकर, भिकाजी शिंदे आदींनी विविध सूचना केल्या. सभेत कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची विक्री होऊ देणार नाही. तसेच आगामी गळीत हंगाम २०१७-१८ सुरू करण्याबाबत ठराव पारित करण्यात आले.
‘नासाका’ विक्रीला सभासदांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:24 AM