किसन काजळे
नांदूरवैद्य, जि. नाशिक : सुपरस्टार दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सुपरहिट ‘गंगा जमुना’ या चित्रपटाचे चित्रिकरण झालेल्या नांदुरवैद्य येथील ब्रिटिशकालीन रोकडे वाड्याला उजाळा मिळाला आहे. या वाड्याचे मालक राजाभाऊ रोकडे यांच्यासह त्या काळातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थांनी दिलीपकुमार यांच्या आठवणी जतन केल्याचे दिसून आले.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सन १९६१-६२ सालात अभिनेते दिलीप कुमार व वैजयंती माला यांचा सुपरहीट ठरलेल्या गंगा जमुना या चिञपटाचे संपूर्ण चिञीकरण येथील रोकडे वाड्यात तसेच भैरवनाथ मंदिर आदीं ठिकाणी जवळपास तीन वर्ष चालले होते. जेष्ठ नागरिकांच्या कानावर दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी येताच हळहळ व्यक्त करण्यात आली. गावातील इंग्रजकालीन रोकडे वाडा व गंगा जमुना चिञपटातील चिञीकरणामुळे नांदूरवैद्य गावची एक ओळख निर्माण झाली. यावेळी चिञपटाचे चिञीकरण संपल्यानंतर दिलीप कुमार यांनी आपली आठवण म्हणून नांदूरवैद्य येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्रीकृष्ण मंदिर असे दोन भव्य मंदिरांचे बांधकाम करून दिले.
काही दिवसांपूर्वीच दिलीप कुमार यांच्या नातेवाईकांनी नांदूरवैद्य येथील रोकडे वाड्याला भेट दिली होती. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना नांदूरवैद्यला इच्छा असतांनाही येता आले नाही. यावेळी सर्व नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांच्या वतीने दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.