नाशिक :इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४१ला रविवारपासून (दि.१) प्रारंभ झाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही नाशिक विभागीय चांद समितीला प्राप्त झाली नाही. तसेच शहरातदेखील ढगाळ हवामानामुळे चंद्रदर्शन शनिवारी घडू शकले नाही. दरम्यान, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी रविवारी सकाळी चंद्रदर्शनाची ग्वाही मिळाल्यानंतर हिजरी सन १४४१ला प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. येत्या मंगळवारी (दि.१०) तारखेला मुहर्रमनिमित्ता ‘आशुरा’चा विशेष दिवस पाळण्यात येणार आहे.हिजरी सन १४४०चा अखेरचा उर्दू महिना जिलहिज्जाची २९ तारीख शनिवारी होती. त्यामुळे चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन शहरासह जिल्ह्यातदेखील कोठेही घडले नसल्याने विभागीय चांद समितीकडून इस्लामी नववर्षाबाबत कुठलीही घोषणा शनिवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली नव्हती. मुंबई येथून चांद समितीची अधिकृत ग्वाही प्राप्त करून रविवारी सकाळी प्रतिनिधी शहरात आल्यानंतर खतीब यांनी इस्लामी नववर्षाला सुरूवात झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यास सुरूवात झाली आहे.जुने नाशिक, वडाळागाव, देवळाली कॅम्प, सातपूर आदि भागात विविध मुस्लीम संघटनांकडून दहा, सात दिवसीय प्रवचनमालांचे आयोजन केले गेले आहे. यानिमित्त धर्माचे गाढे अभ्यासक असलेल्या मौलवींना खास प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. रविवारपासून जुन्या नाशकातील अहमद रजा चौकासह, बागवानपुरा भागात प्रवचनमालांना सुरूवात झाली. तसेच वडाळागावातदेखील तैबानगर आणि कथडा येथील मदरशामध्ये केवळ महिलांसाठी स्वतंत्ररित्या प्रवचनमाला सुरू करण्यात आल्या आहेत. अहमद रजा चौकात मौलाना मुफ्ती हनिफ कानपुरी तर बागवानपुऱ्यात मौलाना शाकीर रजा यांनी प्रवचनमालेचे पहिले पुष्प रविवारी गुंफले.‘करबला’च्या आठवणींना उजाळाइस्लामी नववर्षानिमित्त सोशलमिडियावर शनिवारी सायंकाळपासून शुभेच्छांचा ओघ पहावयास मिळाला. तसेच ‘यादे करबला’विषयीच्या धार्मिक माहितीची देवाणघेवाणही होताना दिसून आली. मुहर्रम हा इस्लामी कालगणनेचा पहिला उर्दू महिना मानला जातो. या महिन्याचे दहा दिवस मुस्लीम बांधव धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे प्रिय नातू शहीदे आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांच्यासह ‘करबला’च्या हुतात्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दिसून येतात. प्रवचनमालांच्या माध्यमातून ‘करबला’विषयीच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत.
यादे करबला : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४१ला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 5:14 PM
मुंबई येथून चांद समितीची अधिकृत ग्वाही प्राप्त करून रविवारी सकाळी प्रतिनिधी शहरात आल्यानंतर खतीब यांनी इस्लामी नववर्षाला सुरूवात झाल्याचे जाहीर केले
ठळक मुद्देविविध मुस्लीम संघटनांकडून प्रवचनमालांचे आयोजन ‘करबला’च्या आठवणींना उजाळा