नाशिक : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे करोनामुळे मुंबईत निधन झाले. त्या वास्तव्याला मुंबईत असल्या तरी त्यांचे शालेय शिक्षण नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकस्तंभ येथील पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात झाले. त्यांनी आठ वर्षांपूर्वी शाळेला भेट दिली होती. त्यामुळे गुरुवारी(दि. १६) संस्थेत आणि शाळेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आली.नीला सत्यनारायण यांनी १९५९ मध्ये इयत्ता पाचवीला पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यापूर्वी इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण संस्थेच्या मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर येथे झाले होते. त्यांच्या यशाची कमान कायम चढती राहिली. निवडणूक आयुक्तपदी असताना आठ वर्षांपूर्वी नीला सत्यनारायण यांनी संस्थेच्या पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाला भेट दिली. नंतर शाळेच्या कार्यालयात पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी व शिक्षकांशी चर्चा केली. यानंतर विद्यार्थिनींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सुमारे ५० वर्षांनंतर शाळेत म्हटली जाणारी ‘हे परमात्मन जगणं निवासा’ ही तोंडपाठ प्रार्थना म्हटली तसेच शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र राज्याचे पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी होत्या. संस्थेला त्यांचा अभिमान होता. त्यांनी प्रशासकीय सेवेत राज्यात उल्लेखनीय कार्य केले होते, अशा भावना संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला यांनी भावना व्यक्त केल्या.
नाशिप्रने जागवल्या नीला सत्यनारायण यांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:25 AM