नाशिक : हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने नाशिकच्या पदाधिकाऱी आणि युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाशिकशी ऋणानुबंध कायम ठेवलेल्या सातव यांनी २०१६ साली नाशिकला एका कार्यक्रमानिमित्त भेट दिल्याची स्मृतीदेखील पदाधिकाऱ्यांनी जागवली.
काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार करणारे आणि कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या राजीव सातव यांनी कायम पक्षासाठी झोकून देऊन काम केले. अनेकदा त्यांनी विविध उपक्रमांच्या निमित्ताने तसेच पक्षकार्यासाठी नाशिकचे दौरे केले. २०१६ साली नाशिकला आगर टाकळी परिसरात उभारण्यात आलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासदेखील ते उपस्थित होते. प्रत्येक उपक्रमावेळी नाशिकच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याशी संवाद साधून त्यांच्या भावना, पक्षवाढीसाठीच्या उपाययोजना याबाबत चर्चा केल्याची आठवण नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
---इन्फो--
नाशिकची सासुरवाडी
रा सातव यांचे श्वशूर वामनराव पैठणकर हे एचएएल कंपनीत अधिकारी होते. त्यामुळे काही काळ ओझर आणि त्यानंतर नाशिकमध्ये त्यांचा निवास होता. त्यामुळेच सातव हे नाशिकला त्यांचे दुसरे घर असल्याचे सांगायचे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकला सातव यांचे येणे झाले तर दिवसभर कामे आटोपून सासुरवाडीला जाऊन पुन्हा सायंकाळच्या कार्यक्रमांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत कॉग्रेस कमिटी कार्यालयात उपस्थित राहत असत.
--कोट ---
भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व गमावले
राजीवजी आणि आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आमचे नेते राहुल गांधी यांचे तर ते अत्यंत निकटवर्तीय होते. पक्षाचे भविष्यातील प्रमुख राष्ट्रीय नेतृत्व असल्याचीच आम्हा सर्वांची भावना होती. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याशी जोडले गेलेले त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राबाहेरही प्रस्थापित झाले होते. त्यामुळे त्यांचे निधन हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का असून आम्ही भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वच गमावले आहे.
डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री
कार्यकर्ता ते नेता असा माझ्या नजरेसमोरचा प्रवास
मी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या कार्यकारिणीत हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात, उपक्रमात आमचा एकत्रित सहभाग असायचा. माझ्यानंतरचे प्रदेश अध्यक्षपद, राष्ट्रीय युवा अध्यक्षपद या सर्व प्रवासात आम्ही सदैव बरोबर होतो. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता, सहकारी ते पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व असा त्यांचा प्रवास मी जवळून अनुभवला. त्यांच्या जाण्याने पक्षाची आणि वैयक्तिक स्तरावर माझी अपरिमित हानी झाली आहे.
शरद आहेर, काँग्रेस शहराध्यक्ष
---
कार्यकर्त्यांचा हक्काचा नेता
२००४ साली ते युवा कॉग्रेसचे प्रदेश चिटणीस असतानाही ते नाशिकचे प्रभारी होते. तेव्हापासूनच त्यांच्याशी खऱ्या अर्थाने ऋणानुबंध जुळले होते. त्यावेळीदेखील ते अगदी साधे आणि निगर्वी व्यक्ती होते. पुढे ते युवा प्रदेशाध्यक्ष झाले, खासदार झाले. त्यानंतरही दिल्लीत आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना हक्काचा नेता म्हणून तेच जवळचे वाटायचे. त्यांच्या निधनाने समस्त युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घरातला माणूस गेल्याचे दु:ख झाले आहे.
राहुल दिवे, नगरसेवक
--------------------
कोणताही बडेजाव नसलेलं नेतृत्व
प्रभारी पद असो किंवा प्रदेशाध्यक्ष असो की ते खासदार असोत कधीही त्यांच्या पदाचा त्यांनी बडेजाव केला नाही. कॉग्रेसच्या कार्यक्रमासाठी रेल्वेने आले तरी पदाधिकाऱ्यांना या, स्वागत करा असा कोणताही बडेजाव न करता रिक्षात बसून ते थेट कार्यालयात आल्याचेही अनेकदा घडले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्व पदाधिकाऱ्यांशी समानतेने वागणारे नेतृत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नरेश पाटील, काँग्रेस शहर सरचिटणीस
---------