नाशिकरोड : नाशिक-कल्याण दरम्यान घाटांमध्ये मेमू लोकल रेल्वेची चाचणी घेण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने लखनऊ येथील रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टॅन्डर्ड आर्गनायझेशन विभागाला दिले आहेत.कल्याण-नाशिक दरम्यानचा प्रवास जलदगतीने होण्याकरिता लोकल सेवा सुरू करावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सब अर्बनची मर्यादा वाढविल्यास कल्याण-कसाराच नव्हे तर कल्याण-नाशिक लोकल रेल्वेसेवा सुरू करणे शक्य होईल. तसेच ही लोकल सुरू झाल्यास दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, कल्याण ते नाशिक दरम्यानच्या ग्रामीण भागांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे गोडसे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणले होते.दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने नाशिक-कल्याण दरम्यान लोकल सेवेला मान्यता दिली होती. चेन्नई कारखान्यातून मुंबईतील इमू प्रकारची ३५ कोटींची लोकल दीड वर्षापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये दाखलही झाली होती. चाचणीसाठी नऊ लाखांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, १५ किलोमीटरच्या कसारा घाटात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वर्षभरापासून लोकलची चाचणीच झाली नाही.घाटातून जाताना प्रवासी रेल्वेगाड्यांना मागूनदेखील इंजिन लावावे लागते. त्यामुळे इमू लोकलसाठी बँकर लावण्यावरून चाचणी रखडली आहे. नाशिक-कल्याण दरम्यान घाटांमध्ये मेमू लोकल रेल्वेची चाचणी घेण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने लखनऊ येथील रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टॅन्डर्ड आर्गनायझेशन विभागाला दिल्याने नाशिक-कल्याण लोकल सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नाशिक-कल्याण घाटांमध्ये ‘मेमू लोकल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:07 AM
नाशिक-कल्याण दरम्यान घाटांमध्ये मेमू लोकल रेल्वेची चाचणी घेण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने लखनऊ येथील रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टॅन्डर्ड आर्गनायझेशन विभागाला दिले आहेत.
ठळक मुद्देरेल्वेची चाचणी घेण्याचे आदेश