जुने नाशिक : इस्लाम धर्म व प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी नेहमीच महिलांची सुरक्षा त्यांचे हक्क व अधिकाराचे महत्त्व लक्षात घेण्याची शिकवण दिली आहे. इस्लामने स्त्री-पुरुष या दोघांमध्ये कधीही कोणताही भेदभाव केलेला नाही. याचा पुरावा कुराणमध्ये अल्लाहने सविस्तरपणे वर्णनातून उपलब्ध करून दिलेला आहे. दोघांनाही एकसमान दर्जा बहाल केल्याचे कुराणमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे पुरुष जेवढा श्रेष्ठ आहे तेवढीच स्त्रीदेखील श्रेष्ठ आहे, हे विसरून चालणार नाही, असा उपदेश मौलाना सय्यद अमीन कादरी यांनी केला.सुन्नी दावत-ए-इस्लामी या आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेच्या वतीने शहरातील इदगाह मैदानावर आयोजित धार्मिक मेळाव्याच्या पहिल्या दिवशी (महिला सत्र) उपस्थित महिलांना अखेरच्या सत्रात कादरी मार्गदर्शन करत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले, एकेकाळी अरबस्तानात स्त्री अर्भक जन्माला आले की त्या अर्भकाला मातीआड केले जात होते. ही अमानवी क्रुरप्रथा हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मानंतर त्यांच्या पुढाकाराने संपुष्टात आली. पैगंबरांनी सर्व जनतेला स्त्रीयांचे महत्त्व व त्यांच्या सबलीकरणाची जाणीव करून दिली. मुलींचे उत्कृष्ट पालनपोषण करत सन्मानाने वागविणाऱ्या आई-वडिलांना स्वर्गात जागा प्राप्तीची ग्वाही पैगंबरांनी त्यावेळीच दिली आहे याचे भान समाजाने ठेवणे गरजेचे आहे. यावेळी व्यासपीठावर मौलाना कारी रिजवान खान, मौलाना गुफरान, रझा, मौलाना इब्राहीम कोकणी आदि मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या नमाजनंतर स्त्रीयांच्या राखीव सत्रापासून दोन दिवसीय इज्तेमाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी कुराणपठण करण्यात आले. या जिल्हास्तरीय धार्मिक मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातून महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मेळाव्याच्या ठिकाणी दोन्ही प्रवेशद्वारावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
स्त्री-पुरुषांना इस्लाममध्ये समान दर्जा
By admin | Published: January 25, 2015 12:07 AM