नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीची नूतन जागा शोधण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्याचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या जागी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळच स्वागत करण्यासाठी महापालिकेचा आग्रह आहे. मात्र, स्वागत समितीने विनम्रपणे नकार दिला आहे. याशिवाय शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मानधन एकत्र करून वारकºयांना टाळ-चिपळ्या देण्याची तयारी दर्शवली असली तरी हे पक्षाने त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच करावे, समितीचा राजकारणाशी संबंध नसल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे. संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आगमन २९ जून रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे त्यासाठी मंडप उभारण्यास शासनाच्या परिपत्रकाचा अडथळा असल्याचे महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराज पालखी समितीला कळविल्यानंतर समितीने त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारे विरोध न करता कार्यक्रमाचे स्थळ बदलले आणि नाशिक पंचायत समितीच्या आवारात पालखीचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी याठिकाणी स्वखर्चाने मंडप उभारण्याची तयारी केली असून, पाणीपुरवठा व इतर अनेक सुविधा पंचायत समितीने पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त आल्यानंतर महापालिकेने आता स्वागत समितीच्या पदाधिकाºयांशी संपर्क साधून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाजवळ स्वागत करण्याचे आवाहन केले. पालखी सोहळ्यासाठी मंडप वगळता अन्य सुविधा पुरवण्याची तयारी दर्शवली. इतकेच नव्हे तर जगदीश पाटील यांनादेखील एका अधिकाºयाने दूरध्वनी करून मंडप तरणतलावाजवळ उभारण्यास सांगितले. मात्र, त्यांनीही ते पालखी स्वागत समितीवर निर्णय सोपवल्याचे वृत्त आहे.दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक बुधवारी (दि.२०) संपन्न झाली. यावेळी नगरसेवकांचे मानधन जमा करून त्यातून पालखी सोहळ्यासाठी सर्व खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. वारकºयांना टाळ-मृदंग हे सर्व त्यातून देण्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भात गटनेता विलास शिंदे यांनी समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांना कळविले. मात्र स्वागत समितीने अशाप्रकारचा उपक्रम समितीच्या माध्यमातून न करता पक्षीय पातळीवर त्याच ठिकाणी करावा, असे पाटील यांनी सूचविले आहे.
पालखी समितीचे मन वळविण्याचे मनपाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:02 AM