लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोनाच्या संकटकालीन स्थितीत शारीरिक आरोग्यासाठी मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य व आध्यात्मिक आरोग्य या चारही दृष्टिकोनातून स्वस्थ्य राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी केले. सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य आर. व्ही. पवार, प्रमुख पाहुणे एन. डी. सोनटक्के, डॉ. उपेंद्र पठाडे, अर्चना पगार, सामाजिक शास्त्र मंडळ समन्वयक प्रा. स्मीतल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात आरोग्याच्या प्रश्नाबाबत सर्वच घटक गंभीर बनले असल्याचे उपप्राचार्य पवार यांनी सांगितले. आरोग्याच्या प्रश्नाबाबत दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. त्याद्वारे जगभरातील आरोग्याच्या समस्यांवर संघटनेने काम केले असल्याचे त्यांनी म्हटले. प्रमुख पाहुणे एन. डी. सोनटक्के यांनी आरोग्याला प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून सुदृढ आरोग्यासाठी संकल्प केला पाहिजे, असे स्पष्ट केले. यावेळी डॉ. उपेंद्र पठाडे व अर्चना पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. नितीन जाधव यांनी केले तर डॉ. राजेंद्र आगवणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. स्मीतल मोरे यांनी केले.
--------------
मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे
जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यबाबतच्या जाणीव, जागृती कार्याचे कौतुक केले. तसेच आजच्या कोरोना साथीच्या काळात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, आदी बाबी सर्वांनी पाळाव्या. प्रत्येकाने मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मनातील भावभावना आणि विचार यांची स्पष्टता येणे आवश्यक आहे. मन बलवान असल्यास कोणत्याही शारीरिक आजारावर मात करता येते, त्यातूनच पुढे सामाजिक आरोग्य राखले जाते. आपल्या आजूबाजूला जे सामाजिक वातावरण आहे त्याची भीती न बाळगता सकारात्मक विचार केल्यास आरोग्य राखता येईल, असे प्रतिपादन रसाळ यांनी केले.
--------------
सिन्नर महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. व्ही. पवार, एन. डी. सोनटक्के, डॉ. उपेंद्र पठाडे, अर्चना पगार, स्मीतल मोरे उपस्थित होत्या. (०८ सिन्नर ३)
===Photopath===
080421\08nsk_5_08042021_13.jpg
===Caption===
०८ सिन्नर ३