नाशिक : जिल्ह्यात रेमडेसिविरचा खप गतवर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढण्यामागे औषधाच्या परिणामकारकतेबरोबरच रुग्णांची मानसिकता तसेच विविध स्तरावरील गैरसमज तसेच आर्थिक गणिते कारणीभूत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. काही घटनांमध्ये रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय रेमडेसिवीरबाबत आग्रही असतात तर काही हॉस्पिटल्सकडून रुग्ण लवकर बरा होऊन बेड झटपट रिकामे व्हावेत, यासाठी गंभीर नसलेल्या रुग्णांनादेखील डोस दिले जात असल्याने रेमडेसिविरचा खप प्रचंड वाढल्यानेच सध्या तुटवडा निर्माण झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गतवर्षीदेखील कोरोनाचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मात्र, त्या वेळीदेखील रेमडेसिविर औषधाच्या वापराचे प्रमाण इतके अधिक नव्हते. रेमडेसिविरला पर्यायी असलेल्या औषधांचा, गोळ्यांचादेखील तितकाच वापर करण्यात येत होता. अगदी गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जेव्हा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते, तेव्हादेखील सध्याच्या तुलनेत रेमडेसिविरचा खप निम्माच होता. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवरांशी झालेल्या संवादात त्यामागे गैरसमज, आर्थिक गणिते आणि झटपट सुधारणा होईल, अशी आशा या बाबींचा समावेश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रेमडेसिविर हे केवळ गंभीर रुग्णांसाठी उपयुक्त ठरते. मात्र, रेमडेसिविर दिल्याने रुग्णाचे प्राण वाचतातच असे कुठल्याही आंतरराष्ट्रीय रँडम कंट्रोल ट्रायलमध्ये दिसून आलेले नाही. खरे तर रेमडेसिविरचा योग्य वापर केल्यास रुग्णाला कदाचित दोन ते तीन दिवस लवकर हॉस्पिटलमधून घरी जाता येते, एवढाच त्याचा उपयोग समोर आला आहे. सध्या असलेला इंजेक्शनचा तुटवडा आणि होणारा काळाबाजार दुर्दैवी आहे. अचानक वाढलेली रुग्णसंख्या जरी खप वाढण्यास कारणीभूत असली तरी मानवी स्वभावाची स्वार्थी बाजूही समाजानेच समाजासमोर मांडलेली दिसत आहे.
डॉ. समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष, आयएमए
रेमडेसिविरला अँटिव्हायलऐवजी लाइफ सेव्हिंग ड्रग म्हणून त्याकडे बघितले जात असून हीच सर्वात मोठी चूक आहे. गंभीर रुग्णांसाठी ते काही प्रमाणात उपयोगी ठरल्याचे काही डॉक्टरांचे मत असले तरी केवळ तेच उपयुक्त आहे, असा त्याचा अर्थ नाही. मात्र, सामान्य आरोग्य कर्मचाऱ्यापासून सामान्य नागरिकाला ते इंजेक्शन माहिती झाल्यामुळेच त्याच्या खपात महाराष्ट्रातच सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे.
- डॉ. विक्रांत जाधव, आयुर्वेद तज्ज्ञ
शासनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार रेमडेसिविर हेच उपयुक्त औषध नाही. मात्र एचआरसीटीमध्ये स्कोर दिसल्यावर रेमडेसिविरच द्यावे, अशीच बहुतांश नागरिकांची मानसिकता झाली आहे. रेमडेसिविर हे केवळ गंभीर रुग्णांसाठीच उपयुक्त असून त्यांच्यासाठीच वापरावेत असेच शासनाचे निर्देश आहेत. मात्र, त्याचा वापर सर्रास होऊ लागल्यामुळेच रेमडेसिविरचा खप प्रचंड वाढला आहे.
- डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा रुग्णालय