नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनचे सुतोवाच राज्य सरकारने केले असले तरी अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसल्याने राज्यभरात संभ्रमावस्था असल्याचे नमूद करीत येत्या दोन ते तीन निर्णय होण्याची शक्यता लक्षात घेत व्यावसायिक दृष्टिकाेनातून विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी सोमवारी (दि.१२) सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
राज्य सरकारचा निर्णय रविवारी सायंकाळपर्यंत येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे राज्यभरातील व्यापारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. परंतु सरकारने आज कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. वर्षअखेर नंतरच्या सरकारी कामकाजाची पूर्तता, तसेच अन्य बाबींची तयारी लॉकडाऊनपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील व्यापारी दहा ते पाच या मर्यादित वेळेत कोरोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचे कडकपणे पालन करून व्यापार सुरू करणार असल्याने, सर्व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आले आहे. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी कोरोना संबंधीच्या निकषांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. यात मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. फिजिकल डिस्टसिंग, सॅनिटायझेशन या बाबींचे कसोशीने पालन करावे. दुकानदार स्वतः व आपल्या कामगारांच्या तपासण्या करून, व्हॅक्सिनेशन सुद्धा लवकरात लवकर करून घ्यावे, असेही आवाहन चेंबरतर्फे राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे.