नाशिक : शहरात उष्णतेचा वाढता कहरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढणारे कमाल तपमान गुरूवारी (दि.१०) थेट ४१.१ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककर दिवसभर उन्हाच्या चटक्याने भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा नाशिककरांना असह्य वाटू लागल्या होत्या. कारण हवेचा वेग पहाटेपासूनच मंदावलेला होता. परिणामी सुर्यकिरणांची प्रखरता अधिक वाढली आणि त्यामुळे दिवसभर नाशिककरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत पोहचल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दुपारपर्यंत शहरात वाऱ्याचा वेग पुर्णता मंदावलेला होता; मात्र चार वाजेनंतर काहीसा वारा सुरू झाला परंतू त्याचाही फारसा उपयोग वातावरणाला झाला नाही. कारण दुपारनंतर निरभ्र आकाशात काही प्रमाणात ढग दाटण्यास सुरूवात झाली होती. एकूणच अशा विचित्र वातावरणामुळे शहराचे किमान तपमान गुरूवारी २४.२ इतके नोंदविले गेले. किमान तपमान २४ अंशापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूणच नाशिककरांना यामुळे रात्रीही उकाडा अनुभवयास आला.
दिवसभर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना रात्री उकाड्याने त्रस्त केले. कारण ढगाळ हवामानामुळे वातावरण फारसे थंड होऊ शकले नाही. सुर्यास्तानंतरही वातावरणात ऊबदारपणा जाणवत होता. रात्रीदेखील वाºयाचा वेग तसा कमीच राहिला. एकूणच उष्णतेचा कहर सध्या सुर्याकडून सुरू आहे. मागील वर्षी १२ मे रोजी कमाल तपमान ४१.२ इतके नोंदविले गेले होते. यावर्षी दोन दिवस अगोदरच कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणाची स्थितीत बदल न झाल्यास तपमान ४१.५ किंवा ४१.८ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उन्हाचा सलग तडाखानाशिककरांना यावर्षी सलग दोन महिन्यांपासून उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागत आहे. एप्रिलअखेरपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवत होती. २७ एप्रिल रोजी ४०.५ इतके उच्चांकी तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मे महिना उजाडताच सुरूवातीचे काही दिवस वारा अधिक चांगला राहिल्यामुळे तपमानाचा पारा कमी होता; मात्र मे च्या दहाव्या दिवशी उच्चांक विक्रमी ४१ अंशापर्यंत तपमान पोहचल्याने नाशिककर भाजून निघाले.