------
नाशिक : शहरात रविवारी (दि.२५) दिवसभर कडक ऊन होते. दुपारी ४.३० वाजेपासून संध्याकाळपर्यंत ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वाराही सुटला. मात्र, कोठेही पावसाच्या सरींचा शिडकावा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. कमाल व किमान तापमानाचा पारा चढता राहत असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाशिककर वातानुकूलित यंत्रांसह कूलर, पंख्याच्या वापरावर भर देत उकाड्यापासून स्वतःचा बचाव करताना दिसून येत आहेत. रविवारी किमान तापमान २१ अंश इतके नोंदविले गेले. यावरून रात्रीच्या उकड्याचा अंदाज लावता येईल. नाशिक शहरात आठवडाभरापासून तापमानाचा पारा पस्तिशीच्या पुढेच स्थिरावत आहे. मात्र, रविवारी पारा ४० अंशाच्या जवळ पोहोचला. रविवारी उन्हाचा तडाखा आणि शासनाकडून घालण्यात आलेले कडक निर्बंध यामुळे शहरात सर्वत्र दुपारी १२ वाजेपासून रात्रीपर्यंत शुकशुकाट पाहावयास मिळाला. उन्हाची वाढलेली तीव्रता आणि कोरोनाचा वाढत्या फैलावामुळे नाशिककरांनी रविवारी सकाळी ११ वाजेनंतर घारबाहेर पडणे कटाक्षाने टाळले. यामुळे सर्वच परिसर निर्मनुष्य झालेला दिसून आला.
दुपारी ४ वाजेपासून हळूहळू ढग दाटून येऊ लागले आणि अर्ध्या तासात सर्वत्र अंधाराचे सावट पसरले. सूर्य दाटलेल्या ढगांमध्ये हरवला. जणू काही मुसळधार पाऊस होईल, असे चित्र निर्माण झाले होते. विजाही चमकू लागल्या आणि काही प्रमाणात मेघगर्जनाही होऊ लागली. मात्र, दाटून आलेले ढग बरसले नसल्याने नाशिककरांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळू शकला नाही.