खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. उन्हामुळे जीव कासाविस होत आहे. अंगभर घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दैनंदिन कामकाजात बदल झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे सामान्य नागरिकांसह शेतकºयांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढणीला वेग आला आहे; परंतु उन्हाच्या प्रकोपातून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत काम करत आहे. अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत आराम व चार वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करताना दिसत आहे. गुराखी सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी घेऊन जात आहे. दुपारी नदीकिनारी किंवा शेतात झाडांच्या सावलीत जनावरे उभे करून आराम करणे पसंत करत आहे. उन्हामुळे विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. कडक उन्हामुळे शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. सकाळी पिकांना पाणी भरल्यानंतरही सायंकाळी शेतजमीन कोरडी दिसून येत आहे. पिके कशी वाचवावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.शाळांच्या वेळेत बदलउन्हाळा सुरू असल्याने शाळेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारी आवश्यक कामासाठी बाहेर निघणारे नागरिक टोपी वा उपरण्याचा वापर करताना दिसत आहे. पंखेसुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडांच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता एवढी वाढली असून, एप्रिल-मे महिना कसा जाईल, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
पारा वाढला : उन्हाच्या तीव्रतेने शेतशिवार, रस्ते ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:31 AM