मागील आठवड्यात थंडीचा तीव्र कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून नागरिकांना बोचऱ्या थंडीपासून काहीअंशी दिलासाही मिळाला. मात्र, रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा थंड वारे वेगाने वाहू लागल्याने पहाटेपर्यंत वातावरण ‘कूल’ बनल्याने सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास १०.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारी महाबळेश्वरचे किमान तापमान १४.९ इतके मोजले गेले. एकूणच सध्या महाबळेश्वरपेक्षा नाशिकचे हवामान अधिक थंड असल्याचा अनुभव येत आहे. पारा पुन्हा घसरल्यामुळे वातावरणात गारठा पहाटे चांगलाच वाढला होता. तसेच सोमवारी सूर्यास्त होताच हवेत गारवा निर्माण झाला होता. रात्री थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने नाशिककरांना काहीशी हुडहुडीही भरली. एकूणच थंडीपासून बचावासाठी नाशिककरांनी सोमवारी पुन्हा उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे चित्र शहर व परिसरात पहावयास मिळाले.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे थंडीची तीव्रता फारशी जास्त अनुभवावयास मिळाली नाही. या हंगामात आतापर्यंत ८.२ अंशापर्यंत किमान तापमानाची २३ डिसेंबर रोजी नीचांकी नोंद झाली आहे. यापेक्षा खाली पारा घसरला नसला तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात वेगाने घसरण होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे.