नाशिक : भारत धर्मनिरपेक्ष देश असून, आपला देश अन् त्याविषयीचे प्रेम मनामध्ये अधिकाधिक वृद्धिंगत करत राष्ट्रीय एकात्मतेला बळ द्या, असा संदेश ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला. ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदनिमित्त ईदगाहवर शेकडो मुस्लीमबांधव एकत्र आले होते.ईदगाहवर सकाळी ८.३० वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. दरम्यान, धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबूब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. त्यांनी ‘बकरी ईद व इस्लाम’ या विषयावर प्रकाश टाकला. सूर्यप्रकाश पडल्याने इदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्यावर असलेले पावसाचे सावट दूर झाले. प्रवचनानंतर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठणाला सुरुवात झाली. डोक्यावर हिरवा, पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध यावेळी मैदानात जमले होते. तत्पूर्वी मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारालगत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेल्या नळांवरून समाजबांधव शुचिर्भूत (वजु) झाले. इदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थितांना ईद व इदगाहचे महत्त्व पटवून सांगत ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दाम्पत्यांनी येऊ देऊ नये, असे आवाहन केले. सव्वादहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थिताना विशेष नमाजपठणाच्या पद्धतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरुवात झाली. उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने नमाज उत्साहात अदा केली. यानंतर खतीब यांनी अरबी भाषेतून ईदचा विशेष ‘खुतबा’ पठण केला. उपस्थितांनी परंपरेनुसार एकाग्रतेने मौन धारण करत तो ऐकला. यानंतर खतीब यांनी सामहिक दुवा सुरू केली. यानंतर सर्वांनी उभे राहून प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामूहिक पठण केले व नमाजपठणाचा सोहळ्याचा समारोप उत्साहात व शांततेत झाला.
देशप्रेम, एकात्मतेचा ईदगाहवरून संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 1:15 AM