नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलाच्या वाहनतळावर आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी, वनभाजी महोत्सवात रानावनात उगवलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आलेले होते. सदर प्रदर्शन पाहण्यासाठी आणि विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती जाणून घेण्यासाठी जाणकारांनी तसेच आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त राजेंद्र कलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनकल्याण समितीचे वाघ, डॉ. विक्रांत मुंशी, जयंत गायधनी, भीमराव गोरे आदी उपस्थित होते. सदर प्रदर्शनात हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी भागांतील आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला.प्रदर्शनात रानात पिकणाऱ्या आगळ्यावेगळ्या भाज्यांबरोबर, संपूर्णपणे सेंद्रिय पद्वतीने पिकवलेला नेहमीचा भाजीपाला हातसडीचा तांदूळ, खुरासणी, रानभाजीचे लोणची आदींची मांडणी करण्यात आलेली होती.
‘रानभाजी’ महोत्सवातून आरोग्य जनजागृतीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:52 AM