पिंपळगाव बसवंत : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, सर्वत्र लग्नपत्रिका छपाईच्या कामात मंडळी व्यस्त आहेत. मात्र ओझर (ता. निफाड) येथील सर्पमित्रांनी स्वत:च्या लग्नपत्रिकेतून निसर्गसंवर्धनासह प्राण्यांविषयी संदेश दिला आहे. पिंपळगाव बसवंत येथील शाळेच्या मुख्याध्यापक अलका भय्यासाहेब रणशूर यांचा मुलगा सुशांत यांचा विवाह ७ फेब्रुवारीस होत आहे. सुशांत हा सर्पमित्र म्हणून परिचित आहे. सर्पमित्राबरोबरच प्राणिमात्रावर प्रेम करणाऱ्या सुशांतने आपल्या लग्नाची पत्रिका आगळीवेगळी छापून प्राणिमात्राबद्दल वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका नागाच्या फण्यावर तयार करून त्यावर महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग क्रमांक २९०४ हा छापला आहे. तसेच पत्रिकेत भारतीय राज्यघटना कलम ५१ अ (ग) मानवाच्या अस्तित्वासाठी जंगल, तलाव, नद्या आणि त्यांचे या सर्वांनी नटलेल्या निसर्गसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करून पर्यावरणातील सजीवाशी अस्मिता जोपासून नाते वृद्धिंगत करणे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे, असा संदेश देण्यात आला आहे. शिवाय पत्रिकेवर बिबट्या, गिधाड, चिमणी, घुबड, फुलपाखरू, मगर आदिंचे फोटो आहेत. सध्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने लग्नपत्रिकेतून नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (वार्ताहर)
निसर्गसंवर्धनाचा लग्नपत्रिकेतून संदेश
By admin | Published: January 10, 2016 11:00 PM