नाशिक : संरक्षण विभागाच्या परवानगीशिवाय चिटपाखरूही घुसू न शकणाऱ्या ओझर विमानतळावर सार्वजनिक बांंधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम चक्क विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे जानोेरी ग्रामस्थांनी रात्री दीड वाजता धाव घेऊन विमानतळाची सुरक्षा पाहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर हा कार्यक्रम थांबविण्यात आल्याचे समजते. या सेवानिवृत्तीला संगीत रजनीसाठी खास मुंबईहून मागविलेला रंगारंग आॅक्रेस्ट्रा डिजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू होता. काल (दि.१) याप्रकाराबाबत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तडक ओझर विमानतळावर धाव घेत दिंडोरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना ओझर विमानतळावर बोलावून घेतले. तत्पूर्वी आयोजकांनी घाईगर्दीत दोन टेम्पो मद्याच्या बाटल्या व एक टेम्पोत खाद्य पदार्थांची उष्टी-खरकटी भरून नेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता असलेले पी. वाय. देशमुख हे सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी हा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समजते. रात्री सव्वानऊ वाजेपासून सुरू झालेल्या संगीत रजनीतील लावण्यांचा कार्यक्रम डिजेच्या आवाजात घुमू लागल्याने जानोरीचे सरपंच नामदेव उंबरसाडे व सुनील घुमरे यांच्यासह ग्रामस्थांनी विमानतळाच्या प्रवेश द्वारावर धाव घेतली. परंतू सुरक्षारक्षकांनी हा परवानगी घेऊन कार्यक्रम सुरू असल्याचे सांगत ग्रामस्थांना तेथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व बडे अधिकारी, काही मक्तेदार सहभागी झाल्याची चर्चा आहे. रात्री दीड वाजेपर्यंत हा साग्रसंगीत पार्टीचा कार्यक्रम सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या ओझर विमानतळाला लागूनच नव्याने झालेल्या विमानतळावर एका शासकीय अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा साग्रसंगीत कार्यक्रम झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी) इन्फो.. संरक्षण खात्याने चौकशी करावी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही. मात्र देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विमानतळावर असा सेवानिवृत्तीचा रंगीतसंगीत कार्यक्रम होणे. गंभीर बाब असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे करणार आहोत. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची व कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. हरिश्चंद्र चव्हाण.खासदार, दिंडोरी (फोटो मेलवर)
ओझर विमानतळावर रंगली ‘साग्रसंगीत पार्टी’ बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याला असाही निरोप; खासदारांनी केली चौकशीची मागणी
By admin | Published: February 01, 2015 11:56 PM