नाशिक : ‘गोदावरी वाचवा, नाशिक वाचवा’, ‘गोदेचे प्रदूषण थांबवा जैवविविधता जोपासा’ असा संदेश जिल्हा प्रशासन, वनविभाग व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.२१) काढण्यात आलेल्या सायकल फेरीतून देण्यात आला. ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाचा भारतातील नद्या सुसज्ज करणे हा महत्त्वाचा उद्देश असून जनजागृतीपर ‘गोदा रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीचे वाढते प्रदूषण ही गंभीर समस्या बनत चालली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असून त्यासाठी जनप्रबोधनात्मक उपक्रम शासकीय विभागाकडून राबवले जात आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सकाळी सात वाजता ठक्कर डोम येथून सायकल फेरीला प्रारंभ करण्यात आला.
नाशिक पश्चिम वनविभागाने सायकलिस्ट फाउंडेशनसोबत एकत्र येत नाशिक शहरातून जाणाऱ्या गोदावरीच्या पूरग्रस्त क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या काँक्रिटीकरणामुळे गोदेचे दुष्परिणाम शहराला भोगावे लागत आहे. हाच विषय घेऊन काँक्रीटमुक्त गोदावरीविषयी जनजागृती करण्यात आली. या सायकल फेरीमध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, महेंद्रकुमार पाटील यांच्यासह सुमारे १२० सायकलपटूंनी सहभाग घेतला होता.
--इन्फो--
लक्ष्मीनारायण घाटावर देशी वृक्षांची लागवड
तपोवनाकडे जाणाऱ्या लक्ष्मीनारायण घाटावर गोदेच्या काठालगत वृक्षारोपण करण्यात आले. भोकर, मोह, जांभूळ, बांबू, पापडा यासारख्या विविध
स्थानिक प्रदेशनिष्ठ सुमारे २० ते २५ प्रजातींच्या रोपांची लागवड आपलं पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे शेखर गायकवाड यांनी वृक्षलागवड व गोदा काँक्रिटमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी गोदेची झालेली दुर्दशा व काँक्रिटीकरणासाठी दिलेला न्यायालयीन लढा याविषयी माहिती दिली.
---इन्फो--
असा होता फेरीचा मार्ग
ठक्कर डोम, एबीबी सिग्नलवरुन महात्मानगर-पारिजातनगरमार्गे जेहान सिग्नल, गंगापूरचा दूधस्थळी धबधबा पुन्हा गंगापूर रोडने शहीद अरुण चित्ते पूल, शासकीय रोपवाटिका, रामवाडी, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, रामकुंडावरुन शाही मार्गावरुन तपोवन अशा मार्गाने सायकल फेरी काढण्यात आली होती.