नाशिक - हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भावना जनमानसात पोहोचली असून हिंदुत्वाचा खरा वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगला आहे. तुम्ही जनतेशी संवाद वाढवा, त्यांच्या कामांसाठी संघर्ष करून पक्षाची ताकद वाढवत नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळवण्याचे आवाहन मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी केले. या संवाद मेळाव्यातून मनसेकडून एकप्रकारे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंगच फुंकले आहे.
मनसेच्यावतीने प.सा. नाट्यगृहात पदाधिकारी आणि मनसैनिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन, अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, दिलीप दातीर, अंकुश पवार, सलीम शेख, सचिन भोसले, पराग शिंत्रे, सुजाता डेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नांदगावकर यांनी आपण प्रत्येकाने एकसंधपणे कार्यरत रहायला हवे. प्रत्येक पक्षासाठी संघर्ष हा आत्मा असून कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, असे सांगितले. यावेळी महाजन यांनी यश मिळाल्यानंतर आपल्याच हातून ते निसटून जाते, म्हणजे आपण कार्यकर्ता म्हणून कुठे तरी कमी पडत असल्याचे सांगून मनसैनिकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, अंकुश पवार, दिलीप दातीर, सलीम शेख यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
राज यांचे पत्र घरोघरी पोहोचवा
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राच्या प्रती तुमच्यातील किती पदाधिकाऱ्यांनी घरोघरी पोहोचवल्या? अशी झाडाझडती नांदगावकर आणि महाजन यांनी सर्व पदाधिकारी, मनसैनिकांची घेतली. आपण केवळ मोबाइलवरच जनसंपर्क वाढवण्याच्या भ्रमात असू तर ते होणार नाही. राज ठाकरे यांचे ते पत्र घरोघरी नेऊन अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी पक्ष फोडला नाही
शिवसेना फुटल्याने आम्हाला कुणालाही आनंद झाला नसल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले. राज ठाकरे यांचे मोठेपण कशात आहे, तर या घटनेतून समजून घ्या, असे नमूद करून महाजन म्हणाले की, जर एकनाथ शिंदे ४० आमदार फोडू शकतात, तर राज ठाकरेंना ते शक्य होते. मात्र, त्यांनी शिवसेनाच नव्हे कोणताच पक्ष कधी फाेडला नाही. त्यांनी बाळासाहेबांप्रमाणे माणसे हेरून कार्यकर्ते, नेते घडवायला प्राधान्य दिल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंना मी जिल्हाध्यक्ष नेमले
आनंद दिघे साहेबांच्या निधनानंतर माझ्याकडे काही काळ शिवसेनेचा ठाणे जिल्ह्याचा पदभार होता. त्यावेळी मी दिघे साहेबांबरोबर सर्वाधिक राहणाऱ्या रघुनाथ मोरे यांना जिल्हाध्यक्ष नेमले होते. मात्र, महिनाभरातच मोरेंचा अपघात झाला. त्यावेळी माझ्यासमोर असलेल्या तीन-चार नावांमधून मी एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. माझी निवड चुकलेली नाही, हे शिंदेंनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.