पाथर्डी फाटा : स्वच्छ भारत- स्वस्थ भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छतेचा संदेश जागोजागी देण्यासाठी नाशिकच्या सायकलिस्टने पुढाकार घेतला असून, दिल्ली ते मुंबई अशी सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.३०) यात्रा सुरू होईल आणि १३ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे.अमेरिकेतील मानाची रॅम स्पर्धा विजेते सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन आणि रॅलीचे संयोजक डॉ. राजेश पाटील यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरात सायकल चळवळ वेगाने रुजते आहे. अनेक डॉक्टर, वकील सायकल चळवळीत सहभागी आहेत. अमेरिकेत रॅमसारखी मानाची स्पर्धा महाजन बंधूंनी जिंकल्यानंतर त्यांचा आनंद दुणावला आहे. त्यातच महाजन बंधूंचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचवण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.३० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधीस अभिवादन करून संदेश यात्रेस प्रारंभ होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ होईल. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र अशा चार राज्यांमधून १६५० किलोमीटरचा प्रवास करून १३ डिसेंबर रोजी मुंबई येथे यात्रा पोहोचेल. या रॅलीसाठी डॉ. महेंद्र व हितेंद्र महाजन तसेच कॅप्टन नीलेश गायकवाड, डॉ. वैभव महाले यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. भाजयुमोचे प्रदेश सचिव डॉ. अमोल पाटील हे समन्वयक असणार आहेत. रॅलीच्या प्रारंभी दिल्लीतील सायकलप्रेमीदेखील सहभागी होणार आहेत. महाजन बंधू मात्र अखेरच्या टप्प्यात सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संदेश यात्रा
By admin | Published: November 26, 2015 10:45 PM