आनंद खरेआठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडाची प्रतीक्षा संपवत मेस्सीने या विश्वचषकातील पहिला गोल करून आपल्या तमाम पाठीराख्यांना दिला दिला.या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ब्राझीलच्या नेयमारची नजाकत बघितल्यानंतर त्याच्याच बार्सिलोना या क्लबचा ज्येष्ठ सहकारी आणि सर्वांत जास्त चर्चेत असणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीची या विश्वचषकातील पहिली झलक पहाण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता होती, ती या सामन्याद्वारे संपुष्टात आली. खरं तर मेस्सीचाही तिसरा विश्वचषक आहे. २००६च्या विश्वचषकात एक गोल करणाऱ्या मेस्सीला मात्र गेल्या २०१०च्या विश्वचषकात एकही गोल करता आला नाही. मॅराडोनाने अर्जेंटिनाला १९८६ आणि १९९०च्या विश्वचषकात विजेते - उपविजेतेपद मिळवत वैभव मिळवून दिले आणि आपल्या नजाकतभऱ्या पदलालित्याने सर्वांना वेड लावले. त्यामुळे तो सर्वांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याच डिएगो मॅराडोनाचा वारसदार म्हणून मेस्सीकडे बघितले जात आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून मेस्सी प्रीमियर फुटबॉल स्पर्धेत तसाच धुमाकूळ घालत आहे. तशीच कामगिरी मेस्सीने या विश्वचषकात करावी अशी जगभरातील त्याच्या सर्वच चाहत्यांची अपेक्षा आहे. मॅराडोना (अर्जेंटिनाचा प्रशिक्षक म्हणून) आणि लिओनेल मेस्सी या जोडगोळीला गेल्या विश्वचषकात १६च्या पुढे मजल मारता आली नाही. मात्र या चार वर्षांत मेस्सी पूर्णपणे परिपक्व झालेला आहे. त्यामुळे विश्वचषकात अर्जेंटिना फायनलच खेळेल असा कयास बांधला जात आहे. त्यासाठी अर्जेंटिनाने आश्वसक सुरुवात केलेली आहे. अर्जेंटिना-बोस्नीया हर्जिगोव्हीना या सामन्यातही या विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यात ब्राझीलच्या मार्सोलीने केलेली सेल्फ गोलची चूक बोस्नीया-हर्जिगोव्हीनाच्या क्लोसीनीचकडून झाली आणि अर्जेंटिनाला आघाडी मिळाली. त्यामुळे बोस्नीयाला बॅकफुटवर यावे लागले आणि मेस्सी, फर्नांडेज, डिमोरिया यांना आक्रमणास जाण्याची जास्त संधी मिळाली. अर्थात बोस्नीया संघाच्या बचावपटू आणि कर्णधार व गोलीची भूमिका पार पाडणाऱ्या बिगोव्हीच यांनी हे सर्व हल्ले परतवून लावत एक तासभर यशस्वी किल्ला लढवला. मात्र रॉड्रिगेसकडून मिळालेल्या एका चेंडूचा ताबा घेत मेस्सीने गोलपोस्टकडे कूच करताना तीन खेळाडूंना लीलया चकवले आणि योग्य जागा तयार करून डाव्या पायाने जोरदार फटका लगावत बोस्नीयाचा कर्णधार - गोली बिगोव्हीचलाही चकवले. मेस्सीने मारलेला चेंडू डाव्या खांबाला लागून जाळीत विसावला आणि स्टेडियममध्ये सामना बघणाऱ्या ६२ हजार प्रेक्षकांबरोबरच टीव्हीवर सामना बघणाऱ्या आपल्या असंख्य चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली. बोस्नीयाचा खेळ बघता या संघाने अर्जेंटिनाला चांगलेच झुंजवले आणि शेवटी शेवटी गोल करून आपली खरी क्षमता दाखवत या गटातून पुढे जाण्यास आपण सक्षम आहोत याची जाणीवही आपल्या गटातील इराण आणि नायजेरीयाला करून दिली. फ्रान्सची आश्वासक सुरुवात १९९८चे विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर फ्रान्सला फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यातच त्यांचा भरवशाचा खेळाडू फ्रॅक रिबेरीला ऐन विश्वचषकाच्या आधी सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. अशा परिस्थितीत हुंडारूसबरोबर आपला पहिला सामना खेळणाऱ्या फ्रान्सने आश्वासक सुरुवात करून आपले यावेळचे इरादे वेगळे आहेत हे स्पष्ट केले. फ्रान्सला १९९८चे विश्वविजेत्याचे वैभव मिळवून देणाऱ्या झिनेदीन झिदानचा वारसदार म्हणून पुढे आलेल्या करीम बेंझेमाने ब्राझीलच्या नेयमार-प्रमाणेच दोन गोल करत (१ पेनल्टीवर आणि दुसरा फिल्ड गोल) झिदानची गादी चालविण्यास आपण सक्षम आहोत याची प्रचिती दिली. हुंडारूस या उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचा कर्णधार गोली व्हालाड्रे आणि इतर बचावपटूंनी फ्रान्सच्या हल्ल्यांना थोपविण्यात यश मिळविले होते, मात्र पेनल्टी मिळाली आणि त्या पेनल्टीच्या गोलमुळे पिछाडीवर पडल्यामुळे त्याची लय बिघडली आणि त्यांनी आणखी दोन गोल अंगावर घेतले. स्वित्झर्लंड-इक्वाडोर या सामन्यात दक्षिण अमेरिकेच्या इक्वाडोरने जी झकास सुरुवात करून गोल करत ही ाघाडी मध्यंतरापर्यंत टिकवूनही ठेवली, मात्र उत्तरार्धात सुरुवातीलाच स्वित्झर्लंडने बरोबरी साधली. ९० मिनिटे हेच चित्र होते आणि बरोबरीत सुटणारा हा पहिला सामना ठरणार असे वाटत असतानाच अतिरिक्त वेळेत (इंजुरी टाइममध्ये) स्वित्झर्लंडच्या सेफ्रोविकने मोका साधत केलेला हा गोल स्वित्झर्लंडला ३ महत्त्वाचे गुण देऊन गेला.
मेस्सीका जादू चल गया
By admin | Published: June 17, 2014 12:25 AM