नाशिक : इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकातील विजेच्या खांबावर काम सुरू असताना या खांबावरील वाहिनीचा वीजप्रवाह अचानकपणे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. महापालिकेच्या पथदीप मीटर तपासणीत सदर बाब समोर आली असून, आता हा प्रवाह कुणी सुरू केला याचा शोध घेतला जाणार आहे. गेल्या गुरुवारी (दि.१७) इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकात विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना महावितरणचा कर्मचारी समीर वाघ यास विद्युत शॉक लागून तो खांबावरच अत्यवस्थ स्थितीत लटकला होता. कर्मचाºयांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करीत असताना महापालिकेच्या पथदीपांचा वीजप्रवाह खंडित करण्यासाठी डीपीतील फ्यूज काढण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच वाहिनीमध्ये वीजप्रवाह आला आणि वाघ यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वीजप्रवाह नेमका कसा सुरू झाला, याबाबतची चौकशी महावितरणने सुरू केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या या वाहिनीवरील पथदीपांसाठी असलेले मीटर तपासणीसाठी चेन्नई येथील ‘सॅन्डस’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या मीटरचे पृथक्करण करून प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार महापालिकेच्या याच वाहिनीवरून वीजप्रवाह अचानक सुरू करण्यात आल्याची नोंद मीटरमध्ये झाली आहे. तसा अहवाल कंपनीने महावितरणला पाठविला आहे. त्यानुसार महापालिकेच्या पथदीप डीपीतूनच वीजप्रवाह सुरू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र नेमका वीजप्रवाह कुणी सुरू केला, याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. वाघ याच्या मृत्यूप्रकरणी महावितरणने यापूर्वीच महापालिकेचय विद्युत विभागाकडे बोट दाखविले आहे तर पालिकेने त्या दिवशी शासकीय सुटी असल्याने कर्मचारी कामावरच नसल्याने प्रवाह सुरू करण्याचा प्रश्नच नसल्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी ज्या ठिकाणाहून वीजप्रवाह सुरू झाला ती मनपाची विद्युतपेटी असल्याने आणि तेथूनच फ्यूज गायब असल्याने या ठिकाणी काहीतरी काम सुरू करण्यासाठी कर्मचारी आले असावेत, असे महावितरणने म्हटले आहे. या ठिंकाणी विजेच्या संदर्भात माहिती असलेली व्यक्तीच येऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून असा प्रकार घडणे अशक्य असल्याचा युक्तिवादही महावितरण खासगीत करीत असून त्यांनी अप्रत्यक्षपणे मनपाच्या विद्युत कर्मचाºयांविषयी शंका घेतली आहे. मनपाच्या कर्मचाºयांनी विजेचे काम करताना महावितरणशी संपर्क साधून कुठे काय काम सुरू आहे याची माहिती घेणे अपेक्षित असते मात्र त्यांनी अशी कोणतीही माहिती घेतली नसल्याने परस्पर असे उद्योग कुणी केले याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. याप्रकरणी आता महावितरणच्या प्रशिक्षण विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
‘त्या’ वाहिनीवरील मीटरची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:08 AM