नाशिक : लॉकडाउनमुळे वीजमीटर रिडिंग करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याने ग्राहकांनी स्वत:हून आपले मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार ग्राहकांनी स्वत:हून आपले मीटर रिडिंग महावितरणला पाठविले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणेदेखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रिडिंग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि ज्या ग्राहकांनी स्वत:हून वीज बिल पाठविले त्यांना त्याप्रमाणे वीज बिल पाठविण्याची व्यवस्था महावितरणने केली होती.महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाइल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडिंग पाठविले आहे. महावितरणकडे स्वत:हून मीटर रिडिंग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये नाशिक परिमंडळातील २५८३१ ग्राहकांनी वीज मीटर रिडिंग पाठविले. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाइल अॅप व वेबसाइटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.-------मोबाइल अॅपवर सुविधा उपलब्धडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन वेबसाइट आणि ‘महावितरण’ या मोबाइल अॅपवर ग्राहकांना मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठवून स्वत: रिडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे.
२५ हजार ग्राहकांनी पाठविले मीटर रिडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:41 PM