नाशिक - शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महा मेट्रोच्यावतीने टायरबेस मेट्रो बसप्रकल्प साकारण्यात येत असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य शासनाला प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिली.
एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच असणार आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जाणार असून नाशिक महापालिकेचा आर्थिक सहभाग नगण्य असणार आहे. या प्रकल्पासाठी 1800 ते 2000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार खर्च करणार आहे. त्यात 60 टक्के रक्कम कर्जातून उभी केली जाईल तर 40 टक्के केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के खर्चाचा भार इक्विटीच्या माध्यमातून उचलणार आहे, असेही दीक्षित यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये गंगापूर ते सीबीएस ते महामार्ग आणि गंगापूर ते नाशिकरोड अशा पद्धतीचे दोन मार्ग असतील. याठिकाणी पोहोचण्यासाठी दोन फीडर मार्ग असणार आहेत. नाशिकची भविष्यकालीन गरज लक्षात घेऊन ही किफायतशीर आणि पर्यावरण स्नेहीसेवा असेल असेही ते म्हणाले. यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच महा मेट्रोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.