नाशिक : नाशिक महानगर नियोजन समितीच्या २०१५च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये अनुत्साह दिसून येत असून, उद्या (दि. ३१) गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. कालपर्यंत अवघे तीनच अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.नाशिक महानगर नियोजन समितीच्या ३० जागांसाठी २९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यात ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद) गटातून ११ सदस्य, लहान नागरी क्षेत्र (नगर परिषदा/पंचायत) १ सदस्य, मोठे नागरी क्षेत्र (महापालिका) १८ सदस्य नाशिक महानगर नियोजन समितीसाठी निवडून द्यावयाचे आहेत. १७ डिसेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ३१ डिसेंबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. १ जानेवारी २०१६ रोजी प्राप्त झालेली नामनिर्देशन पत्रे प्रसिद्ध करण्यात येणार असून,४ जानेवारी सकाळी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. १३ जानेवारी २०१६ पर्यंत उमेदवारांना माघार घेण्याची मुदत असून,१४ जानेवारी २०१६ रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान नाशिक महानगर नियोजन समितीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ३० जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया किचकट असल्याने त्यासाठी उमेदवार फारसे उत्साही दिसत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद) गटासाठी दोन अर्ज आले असून, त्यात पिंपळगाव बसंवत येथील सरपंच गांगुर्डे यांचा तसेच सिन्नर तालुक्यातील चिंचोलीच्या सरपंच सौ. सानप यांचा अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच महानगरपालिका क्षेत्रासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
महानगर नियोजन समिती निवडणुकीत अनुत्साह
By admin | Published: December 30, 2015 11:06 PM