नाशिक : गणेशोत्सवात शाडूमातीच्या मूर्तींचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने यापुढे फक्त शाडूमातीच्या मूर्तींसाठीच स्टॉल्स उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यामुळे हळूहळू प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बाजारातच आणणे कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.शहरात गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे. यंदा गणेश विसर्जनच्या वेळी मूर्तींच्या संकलनात घट झाली असली तरी पर्यावरणविषयक प्रबोधनामुळेच ही घट झाल्याचा महापालिकेचा दावा आहे. आता त्यापुढे जाऊन महापालिकेने पुढील वर्षी फक्त शाडूमातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठीच स्टॉल्स देण्याचा विचार सुरू केला आहे. महापालिकेच्या वतीने गोल्फ क्लब मैदानासह विविध भागात स्टॉल्स लिलावाने दिले जातात. याशिवाय महापालिकेच्या परवानगीशिवाय रस्त्यावर कुठेही स्टॉल्स उभारण्याची परवानगी नाही. त्याचा विचार करता महापालिकेने आता जे विक्रेते शाडूमातीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवतील त्यांनाच स्टॉल उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केल्याचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले. याबाबत आत्ताच घोषणा झाल्यास विक्रेते शाडूमातीच्याच गणेशमूर्ती विक्रीसाठी आणतील, असे मनपाचे म्हणणे आहे. शहरात गेल्या काही वर्षांत पर्यावरणविषयक जागरूकता वाढत आहे. २००८ पासून नाशिक महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात तसेच जलाशयांंच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यास सुरुवात केली. महापालिका आणि पर्यावरणप्रेमींच्या सहभागामुळे दिवसेंदिवस गणेशमूर्ती संकलनाचा आकडाही वाढत गेला. गेल्या वर्षी तर २ लाख ३९ हजार इतक्या विक्रमी संख्येने मूर्ती संकलित झाल्या होत्या. यंदा त्यात घट झाली आणि १ लाख ६९ हजार मूर्तीच संकलित झाल्या. तथापि, हे केवळ नागरिकांमध्ये प्रबोधन झाल्याने त्यांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बसविल्या आणि त्याचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने केल्याने मूर्ती संकलनात घट झाल्याचा महापालिकेचा दावा आहे.
शाडूमातीच्या मूर्तींनाच मनपा देणार स्टॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:03 AM