नाशिक : शहरातील एकमेव कथित स्मार्ट रोडचे रामायण अजूनही सुरू असून नाशिककरांना त्यामुळे झालेला त्रास ताजा असताना आता शहरात गेली पंचवीस वर्षे अत्यंत मजबूत असलेल्या मेहेर ते महाबळ चौक फोडण्याची तयारी स्मार्ट सिटी कंपनीने केली आहे. त्यामुळे नाशिककरांना धडकी भरली आहे. आजपर्यंत ज्या रस्त्यावर कधी पावसाचे पाणी साचले नाही आणि अगोदरच त्याठिकाणी व्यवस्थाही आहे, त्या रस्त्याचे खोदकाम केवळ पावसाळी गटारींसाठी करण्यात येणार आहे हे विशेष.
नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने होऊ द्या खर्च या तत्वावर जी कामे सुरू आहेत, त्यात ही कामे समाविष्ट असल्याचा आरोप आहे. केवळ हाच रस्ता नव्हे तर शिवाजी रोड तसेच रविवार कारंजा ते नेहरू उद्यानापर्यंतचा रस्तादेखील खेादण्यात येणार आहे. त्यास आता कंपनीच्या संचालकांनीच आक्षेप घेतला आहे.
गेल्या तीन वर्षात नाशिकमध्ये फक्त त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्ट रोडचीच चर्चा कायम राहिली. अवघ्या एक किलोमीटर अंतरासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च करून नागरिकांना रस्ता तर चांगला झाला नाहीच उलट हमरस्ता बंद करून ठेवल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागला.
हा रस्ता पूर्ण होत नाही तर आता गावठाणातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर आता शहरातील सर्वाधिक चांगला महात्मा गांधी रोड रस्ता खोदण्याचा घाट घातला जात आहे.
नाशिक महापालिकेने १९९५-९६ मध्ये मेहेर ते महाबळ चौक हा रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण पध्दतीने बनवला. या प्रकारचा हा पहिलाच रस्ता असून तो तयार झाल्यानंतर आजवर या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. शहरातील सर्वात टिकाऊ रस्ता म्हणून त्याकडे बघितले जात असताना दुसरीकडे मात्र आता स्मार्ट सिटी कंपनीने या रस्त्याच्या खेादकामाचा घाट घातला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील गावठाण भागात अशाप्रकारचे रस्ते तयार करण्याचे काम करताना त्यात पावसाळी गटारी टाकण्याचे नियोजन केले असून त्या अंतर्गत संपूर्ण एमजी रोड नसला तरी काही प्रमाणात रस्ता खोदावा लागणार आहे. हा रस्ता खोदल्यानंतर मुळात किती महिन्यात पूर्ण होईल याविषयी शंका आहे. पुन्हा त्यात गुणवत्तेचा प्रश्न असून पंचवीस वर्षापूर्वीप्रमाणे रस्ता हेाईल काय याविषयीदेखील शंका आहे.
इन्फो..
जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा
शहरातील महत्त्वपूर्ण रस्ते गरज नसताना फोडण्यास कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी विरोध केला असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. शहरातील चांगले रस्ते फोडल्यास नागरिक देखील रस्त्यावर उतरतील त्यामुळे वेळीच हे काम रोखावे अशी मागणी खैरे यांनी केली आहे. सध्या गावठाणात खोदलेले रस्ते देखील सध्याच्या स्तरापेक्षा खाली खोदले असून त्यामुळे पुराचे संकट असताना आणखी खोदकाम करण्यास विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
इन्फो...
कंपनीचे संचालक अनभिज्ञ
गावठाणातील रस्ते विकास अशा एकत्र कामाला मंजुरी घेताना कोणत्याही प्रकारची सविस्तर माहितीच संचालकांसमेार दिली जात नाही. त्यामुळे संचालकदेखील अनभिज्ञ असल्याचे गुरूमित बग्गा यांनी सांगितले.
--------------
छायाचित्र क्रमांक ८७
100721\10nsk_46_10072021_13.jpg
नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड