महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. रोहयो योजनेत सहभागी प्रत्येक व्यक्ती हा लखपती व्हावा या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करून २०२२-२३ बजेटच्या कृती आराखड्याबाबत नंदकुमार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी घरकुल व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या दोन्ही विभागात समन्वय साधताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत माहिती दिली. या तांत्रिक अडचणी लवकरच सोडविण्यात येतील व योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून, या फॉर्मद्वारे एका महिन्याच्या आत कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात येईल, असे नंदकुमार यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी जिल्ह्यातील रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. बैठकीस सर्व गटविकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.